Sat, Feb 23, 2019 17:11होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड शहराशी संपर्क कायम

पिंपरी-चिंचवड शहराशी संपर्क कायम

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:28PMपिंपरी :  शहर भाजपच्या बैठकांमध्ये शहर विकासाचा नियमितपणे आढावा घेतला जातो. तसेच मुंबईत लोकप्रतिनिधी,  पालिका पदाधिकार्‍यांच्या बैठका होतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराशी संपर्क कायम आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. 

पालकमंत्री पालिकेच्या कार्यक्रमांना येत नसल्याबद्दल त्यांना शहराची अ‍ॅलर्जी आहे का, असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचे  शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या संदर्भात विचारले असता पालकमंत्री बापट बोलत होते.  ते म्हणाले की, मी मंत्री असल्याने राज्यभरात फिरावे लागते. सातत्याने अनेक बैठका व चर्चा असतात. त्यामुळे 6 महिने राज्यात फिरण्यातच जातात. पुण्यातील असल्याने तेथील कार्यक्रमांनाही उपस्थित राहावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरातही नियमितपणे येत असतो. पक्ष व शहर विकासाबाबत नियमित बैठका होतात. त्यात आढावा घेतला जातो. शहरासंदर्भात अनेकदा मुंबईत बैठका झाल्या आहेत. त्यात शहराध्यक्ष आ.  जगताप, आ. लांडगे, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व इतर पदाधिकारी असतात.

भाजपने विकासाचा अंजेडा ठरविला आहे. त्याप्रमाणे काम केले जात आहे. शहरात किती वेळा आलो या संदर्भात संख्या व तारखेनुसार यादी देण्यास मी तयार आहे. या पुढेही शहरातील कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावली जाईल. पुणे व पिंपरी-चिंचवड असा भेद मी कधी केला नाही. मात्र, विरोधकांच्या टीकेला मी महत्व देत नाही. भाजपने पालिकेत बचतीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे अनेक खर्चास फाटा दिला आहे.  त्या अंतर्गत उद्घाटनाच्या कार्यक्रमाची शो बाजी न करता छोटीखानी कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे बापट यांनी सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारला की,  महापालिका कर्मचारी महासंघाच्या कामगार भवनाचा कार्यक्रम रविवारी (दि.13) झाला. त्याच दिवशी मदर तेरेसा पुलाचे उद्घाटन कार्यक्रम घेतला असता, तर खर्चात बचत झाली असती. उत्तरात बापट म्हणाले की, कामगार महासंघाचा कार्यक्रम खासगी होता. पुलाचा उद्घाटन कार्यक्रम पालिकेचा आहे. नियोजन जसे होईल, त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले जातात. ठरलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रकारांना दिले जाईल, असे खोचक उत्तर त्यांनी दिले.