होमपेज › Pune › पितृसत्ताक धोरणानेच स्त्री उपभोगाची वस्तू 

पितृसत्ताक धोरणानेच स्त्री उपभोगाची वस्तू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

अत्याचाराच्या घटना या नकार पचवू न शकल्यामुळे घडतात. तसेच सत्तास्थाने मिळवण्याच्या नादात व परीचितांकडूनच स्त्रीयांवर अत्याचार केले जातात. महीलांप्रमाणेच या व्यवसायात पुरुंषाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे समाजात महिला सेक्स वर्कर्सच्या प्रश्नाबरोबरच  पुरुष सेक्स वर्कर्सच्या प्रश्नांवरही चर्चा घडवून आणली पाहीजे. पितृसत्ताक धोरणच स्त्रीला उपभोगाची वस्तू बनवते, त्यामुळे बाई फक्त उपभोगाची वस्तू आहे हा विचारच बदलण्याची गरज आहे, असे मत तृतीयपंथी दिशा पिंकी शेख यांनी  व्यक्त केले. 

‘आफ्टर 40’ या शॉर्टफिल्मला संवेदनशिल विषयावरील निर्मितीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पत्रकार कै. भा.वि. कांबळे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित ‘40 नंतरच्या वेश्यांचे जीवन एक चिंतन’ परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दिशा शेख बोलत होत्या. या परिसंवादात यामध्ये डॉ. अनिल अवचट , वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसन केंद्राच्या संचालिका ज्योती पठाणिया व कवियत्री दिशा पिंकी शेख यांनी सहभाग घेतला. या वेळी निर्माते अ‍ॅड. श्रीकांत मोरे, लेखक- दिग्दर्शक विजय जगताप, अरुण कांबळे आदी उपस्थित होते. 

दिशा शेख म्हणाल्या की,  मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू आहे. स्त्रियांबरोबर पुरूषांच्याही आरोग्याचा व पूनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परदेशात या व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. भारतात या व्यवसायाला मान्यता का मिळत नाही असा सवाल करत या कामाला कामाचा दर्जा मिळाला तर येथे काम करणार्‍याचे शोषण थांबेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
ज्योती पठाणीया यांनी यावेळी वेश्या हा शब्दच खटकत असल्याचे सांगितले. त्या वेश्या नसून बाजारु लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आहेत. स्वतःहून कुणीही या व्यवसायात येत नाही. जर त्या स्वखूषीने येथे आल्या असत्या तर त्यांना वेश्या म्हणणे योग्य होते. हल्ली कुटूंबातील संवाद हरवला असून मुला-मुलींशी सुंसवाद साधण्याची आवश्यकता आहे. आपण नेमके तेच टाळतो. यामुळे ही मुले चुकीच्या मार्गावर पाऊल टाकतात. परीचितच मुलींचे शोषण करतात. हे कुठेतरी थांबायला हवे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

‘वेश्या व्यवसाय हा संस्कृतीवरचा डाग’

वेश्यांना जनावरासारख वागवले जाते. तिथे माणुसकी शिल्लकच राहत नाहीत. वेश्यांचे जीवन अत्यंत भयावह आहे. जीवंतपणीच त्यांच्या वाट्याला नरक यातना आल्या आहेत. वेश्या व्यवसाय हा संस्कृतीवरचा डाग आहे, असे जीवन कोणाच्याही वाट्याला येऊ नये, असे मत  ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी येथे व्यक्त केले. ‘अफ्टर 40’ शॉटफिल्ममुळे या महिलांच्या समस्यांना वाचा फुटणार आहे, या शब्दात त्यांनी लघुपटाचे विशेष कौतुक केले.


  •