Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय प्रेमलोक पार्कमध्ये

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:52AMपिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणारे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा इमारतीमध्ये सुरू केले जाणार सदर इमारत आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 13) आयत्यावेळी मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. 

शहरासाठी नव्या पोलिस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाच्या 10 एप्रिलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आयुक्तालयाला मंजूरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. प्रिेंमलोक पार्क येथील पालिकेच्या फुले शाळा, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची इमारतीची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी फुले शाळेची इमारत आयुक्तालयासाठी योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी 5 मे रोजी पालिकेला दिले होते. त्यानुसार शाळेची इमारत आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.

दोन मजल्यांची ही शाळेची इमारत आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ 4 हजार427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर, पहिला मजला 731.29 चौरस मीटर आणि दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर 7 वर्गखोल्या असून एक सभागृह आहे. आयुक्तालयासाठी पालिका सदर शाळा इमारतीची रंगरंगोटी व फर्निचर करून देत आहे.  पालिका नियमानुसार पोलिसांकडून भाडे आकारले जाणार आहे. मात्र, किती भाडे आकारणार आहे, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. येत्या 15 ऑगस्टला आयुक्तालय कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. हे आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. तब्बल 50 ते 100 एकर जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी आयुक्तालयाची इमारत उभी केली जाणार आहे. 

प्रेमलोक पार्क येथील फुले शाळा पालिकेच्या दळवीनगर येथील शाळेत स्थलांतरीत केली जाणार आहे. त्या ठिकाणी येथील सुमारे 650 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठी वर्ग खोल्या व बाकांची सोय केली आहे. 

पोलिस आयुक्‍तालयासाठी 4 हजार 840 पदे

पोलिस आयुक्‍तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत.