Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:11AMपिंपरी : प्रतिनिधी

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या आयुक्‍तपदी अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्‍ती होणार असल्याचे राज्य शासनाने सोमवारी स्पष्ट केले आहे. तर सोमवारी अधिसूचना झालेल्या आणि दोन दिवसांपूर्वी 14 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या या आयुक्‍तालयासाठी पुणे शहर पोलिस दलातील 1855 आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील 352 असे एकूण 2207 पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळणार आहेत. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी पोलिस आयुक्‍त राहणार असून त्यांच्यासोबत एक अप्पर पोलिस आयुक्‍त (पोलिस उपमहानिरीक्षक), चार पोलिस उपायुक्‍त (गुन्हे शाखा, विशेष शाखा, मुख्यालय आणि परिमंडळ-1) हे काम पाहणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्‍त (देहूरोड) यांच्याकडे देहूरोड पोलिस ठाणे, तळेगांव पोलिस ठाणे, तळेगांव एमआयडीसी पोलिस ठाणे आणि निगडी पोलिस ठाणे राहणार आहे तर सहाय्यक आयुक्‍त (पिंपरी विभाग) यांच्याकडे पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन असणार आहे.

सहायक पोलिस आयुक्त (वाकड) यांच्याकडे वाकड, हिंजवडी आणि सांगवी पोलिस ठाणे असणार आहे. तर सहायक पोलिस आयुक्त (चाकण) यांच्याकडे दिघी, आळंदी, चिखली आणि चाकण पोलिस ठाणे असणार आहे. गुन्हे आणि विशेष शाखेत प्रत्येकी एक सहाय्यक पोलिस आयुक्‍त राहणार असून वाहतुक आणि प्रशासनासाठी प्रत्येकी एक सहाय्यक आयुक्‍त राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी एकुण 4 हजार 840 मनुष्यबळाची गरज आहे. त्यापैकी तब्बल 2 हजार 633 पदे नव्याने निर्माण करण्याची गरज असून ती 3 टप्प्यात निर्माण केली जाणार आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील 2 हजार 207 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस दलातील एक पोलिस उपायुक्‍त, एक सहाय्यक पोलिस आयुक्‍त, 27 पोलिस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, 82 पोलिस उपनिरीक्षक, 188 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 376 पोलिस हवालदार, 371 पोलिस नाईक, 781 पोलिस शिपाई आणि 6 अकार्यकारी दल (मंत्रालयीन कर्मचारी व वर्ग-4) अशा एकुण एक हजार 855 जणांना पिंपरी-चिंचवडच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येणार आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील एक पोलिस उपायुक्‍त (अप्पर अधिक्षक), एक सहाय्यक आयुक्‍त (उपविभागीय अधिकारी), चार पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक निरीक्षक, 13 पोलिस उपनिरीक्षक, 34 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 79 पोलिस हवालदार, 89 पोलिस नाईक आणि 127 पोलिस शिपाई अशा एकुण 352 जणांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात नेमणुक करण्यात येणार आहे. आयुक्‍तालयासाठी लागणारी 2 हजार 633 ही पदे आगामी 3 टप्प्यात निर्माण करण्यात येणार आहेत. 

नवीन निर्माण करण्यात येणार्‍या पहिल्या टप्प्यात (म्हणजेच 2 हजार 633 पदे निर्माण करताना) आयुक्‍त, अप्पर आयुक्‍त, दोन उपायुक्‍त, सात सहाय्यक आयुक्‍त, 24 पोलिस निरीक्षक, 36 सहाय्यक निरीक्षक, 65 उपनिरीक्षक, 88 सहाय्यक उपनिरीक्षक, 174 पोलिस हवालदार, 336 पोलिस नाईक आणि 744 पोलिस शिपाई एवढी पदे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात सात पोलिस निरीक्षक, 14 सहायक निरीक्षक, 29 उपनिरीक्षक, 32 सहायक उपनिरीक्षक, 61 हवालदार, 114 पोलिस नाईक आणि 259 पोलिस शिपाई तर तिसर्‍या टप्प्यात पाच निरीक्षक, आठ सहायक निरीक्षक, 26 उपनिरीक्षक, 31 सहायक उपनिरीक्षक, 55 हवालदार, 112 पोलिस नाईक आणि 252 पोलिस शिपाई यांची पदे निर्माण केली जाणार आहेत.