Mon, Jun 17, 2019 04:09होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’चे कामगार वार्‍यावर

‘पीएमपीएमएल’चे कामगार वार्‍यावर

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:13AMपिंपरी : पूनम पाटील

सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एकत्रित पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) स्थापन करण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला. मात्र पीएमपीएलला कामगारांची फिकीरच नसल्याने आज वाहक-चालक (डायव्हर-कंडक्टर) यासह पीएमपीएलच्या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार कर्मचार्‍यांतून होत आहे. 

पीएमपीएलच्या कामगारांना कामाच्या ठिकाणी डेपो, बस स्थानकांवर मुलभूत सोयी-सुविधांसह सेवा निवृत्तीपर्यंत असंख्य अडचणी आहेत. कामाच्या ठिकाणी विसाव्यासाठी केवळ पत्रावजा शेडची कामचलाऊ व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. जेवणासाठी बसमध्येच बसावे लागते. बस थांबल्यावर प्रवासी लगेचच बसमध्ये चढतात. त्यामुळे केवळ वीस मिनिटातच जेवण करावे लागते. महिला कंडक्टरसाठी स्वच्छता गृहांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत. शौचालयासाठी लांबवर चालत जावे लागते. यामुळे अनेकदा बसला उशीर होतो. 

अनुकंपातत्वावर आजमितीला प्रत्येक डेपोला जवळपास वीस ते तीस कर्मचारी असून पीमपीएमएलच्या नियमानुसार चार वर्षांपासून 240 दिवस काम करुनही त्यांना आजवर कायम करण्यात आले नाही, अशी तक्रार कामगारांनी केली आहे. आठ तासांऐवजी सोळा तास काम करावे लागते. कायम स्वरुपाची नोकरी नसल्याने लवकर येवूनही ड्युटी दिली जात नाही. एक फिक्स बस दिली जात नाही. बंद पडलेल्या बसही रुटवर दाखवल्या जातात. तक्रार करावयास गेले असता तू कायम सेवेत नसल्याने तक्रार करु नकोस, बाजूला बस असे सांगण्यात येते. तक्रार केल्यास नोकरी जाण्याची भिती कामगारांनी व्यक्त केली. कुटुंबाची जबाबदारी असल्याने पुरेशा वेतनाअभावी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार येतो, असे हताशपूर्ण संवाद त्यांच्याकडून ऐकायला मिळाले.

निवृत्तीस आलेल्या कर्मचार्‍यांना हक्काच्याही रजा मिळत नाहीत

निवृत्तीला आलेल्या कामगारांना संबंधित अधिकार्‍यांकडून हीन दर्जाची वागणूक मिळत असून किरकोळ रजा हवी असेल तरी वैद्यकिय प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते. एका दिवसाच्या वाद्यकिय प्रमाणपत्रासाठी 100 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतो. काहीजण पुढील महिन्यात निवृत्त होत असून आजवर अनेकांच्या मोठ्या प्रमाणात रजा शिल्लक आहेत. त्यांना त्या दिल्या जात नाहीत. याउलट कामावर न आल्यास त्या दिवसाचा पगार कापला जात असल्याचे गार्‍हाणे अनेक कामगारांनी मांडले.