Fri, Jul 19, 2019 05:22होमपेज › Pune › आमदार जगतापांनी मारले एका दगडात अनेक पक्षी

आमदार जगतापांनी मारले एका दगडात अनेक पक्षी

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:21AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विलास मडीगेरी , शीतल शिंदे , राहुल जाधव यांची नावे स्पर्धेत असताना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना संधी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. लोकसभा ,विधानसभा तोंडावर असताना आपले ऐकणार्‍या व्यक्तीच्या हाती पालिका तिजोरीच्या चाव्या राहाव्यात अशी खेळी केली. मडीगेरी यांच्या पाठीशी ताकद उभी करणार्‍या जुन्यांना आपल्या कृतीने ताकद दाखवून दिली. खासदार श्रीरंग बारणे यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या जितेंद्र ननावरे यांचा सेनेत प्रवेश घडवून आणला होता. मागासवर्गीय महिलेला सलग दुसर्‍या वर्षी स्थायी अध्यक्षपदी संधी देऊन आमदार जगताप यांनी बारणे यांना मात दिली आहे.  

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नगरसेवक विलास मडीगेरी, शीतल शिंदे व राहुल जाधव यापैकी एकाला संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती. पक्षातील जुने निष्ठावंत विलास मडीगेरी यांच्यासाठी एकवटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मडीगेरी यांच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्तही पसरले मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या तर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी शीतल शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याची चर्चा होती मात्र, राजकारणात अतिशय धूर्त असलेल्या जगताप यांनी खेळी केली.  

आपल्या समर्थक ममता गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे आणून त्यांना स्थायी अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली. त्यांच्या या धक्का तंत्राची भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला तर स्थायी समिती  सदस्य राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. शहराच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौरपदाचा राजीनामा देत आहे असे नितीन काळजे यांनी  राजीनामा देताना सांगितले.

या राजीनामा नाट्यामुळे  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली खरी मात्र, महापौरांचा राजीनामा ही आमदार जगताप यांनी महेश लांडगे यांना हाताशी धरून केलेली खेळी आहे. त्याबदल्यात आता लांडगे गटातील राहुल जाधव अथवा संतोषअण्णा लोंढे यापैकी एकाला महापौरपदी संधी देण्यात येणार असल्याचे समजते. आमदार लक्ष्मण जगताप यांची लोकसभेपासून पाठराखण करत असलेल्या आशा शेंडगे यांना उपमहापौरपद तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदापासून डावलले गेलेल्या विलास मडीगेरी यांना पक्षनेतेपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे 

 भाजपमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून रणकंदन माजल्याचे चित्र दिसताच राष्ट्रवादीने मोरेश्वर भोंडवे यांचा स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी न दिल्याने राहुल जाधव व शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. लक्ष्मीपुत्र  असलेले मोरेश्वर भोंडवे घोडेबाजारात भाजपमधील नाराजांची मते फोडू शकतात. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी येत्या बुधवार दि.7 रोजी होणार्‍या निवडणुकीत चमत्कार घडणार की भाजपमधील वाद हे पेल्यातील वादळ ठरणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.