Thu, Feb 21, 2019 09:04होमपेज › Pune › दगाफटका होणार नाही

दगाफटका होणार नाही

Published On: Mar 07 2018 2:13AM | Last Updated: Mar 07 2018 2:13AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड बुधवारी (दि. 7) होणार आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होणार नाही. उलट विरोधकांची काही मते आम्हाला मिळणार आहेत, असा विश्‍वास सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी (दि. 6) व्यक्त केला. दरम्यान, बुधवारी स्थायी समितीच्या 34 व्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. 
सत्ताधारी भाजपकडून ममता गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोरेश्‍वर भोंडवे हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. त्यांची निवड बुधवारी दुपारी बाराला मधुकरराव पवळे सभागृहात निवडणूक होणार आहे. या संदर्भात विचारले असता, सत्तारूढ पक्षनेते पवार पत्रकारांशी बोलत होते. 

पवार म्हणाले की, नियमानुसार पक्षाने स्थायी समितीच्या पक्षाच्या सर्व 11 सदस्यांना ‘व्हीप’ काढून पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्व सदस्य पक्षाचे अधिकृत उमेदवार गायकवाड यांनाच मतदान करतील. उलट विरोधातील राष्ट्रवादीचे काही सदस्य आमच्या उमेदवारालाच मतदान करतील. निवडणुकीत कोणताही दगाफटका होणार नसल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, पालकमंत्री व शहरातील प्रमुख नेतेमंडळींनी भाजपच्या सदस्यांना स्वत: संपर्क साधून पक्षाचा ‘व्हीप’ बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली; तसेच काहींच्या घरी जाऊन ‘व्हीप’ दिले गेले आहेत. 
ममता गायकवाड यांनाच मत देण्याची सक्त ताकीद सदस्यांना देण्यात आली आहे. मते फुटल्यास कारवाईची तंबी देण्यास पक्षनेते विसरलेले नाहीत. त्यामुळे पक्षाने स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, हे स्पष्ट होत आहे.

तसेच, राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे हे राष्ट्रवादी व शिवसेनेशिवाय भाजपतील नाराज सदस्यांचीही मते मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपातील नाराजांना गळ टाकून त्यांना आपल्या बाजूने मतदान करण्याबाबत राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे ते भाजप सदस्यांची मते खेचण्यात यशस्वी होतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.