Mon, Mar 25, 2019 18:10होमपेज › Pune › मुंबईपाठोपाठ पालिकेत ‘सीएसआर सेल’ कार्यान्वित

मुंबईपाठोपाठ पालिकेत ‘सीएसआर सेल’ कार्यान्वित

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:04AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टीव्हीटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे प्रत्यक्ष कामकाजाला नुकतीच सुरूवात झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. येथील कंपन्यांकडून ‘सीएसआर’ अंतर्गत निधी उपलब्ध करून घेऊन शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सन 2017-18 या अर्थसंकल्पात ‘सीएसआर अ‍ॅक्टीव्हीटी’ या लेखाशिर्षाची नव्याने तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेने सदर सेलचे कामकाज पाहण्यासाठी विजय वावरे यांची या अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली गेली आहे. 

त्यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभाग येथे असणार आहे. प्रत्यक्ष सीएसआर सेलचे कामकाज नुकतेच सुरू झाले आहे. शहरातील सीएसआर अंतर्गत केलेल्या कंपन्यांची यादी आणि त्यामाध्यमातून आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामांची माहिती वावरे यांना देण्यात आली आहे. त्यानुसार वावरे यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. पिंपरीतील थिसेन क्रुप इंडस्ट्रिज कंपनीने महापालिकेस दोन शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शिक्षणासोबत शहरातील झोपडपट्टयांमध्ये मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यावर सीएसआर सेलचा प्रामुख्याने भर असणार आहे. काही कंपन्या वास्तू बांधून देतात. जसे काही कंपन्यांनी ‘टॉलयेट’ बांधून दिले आहेत. त्यांची दैनंदिन स्वच्छता, देखभाल व दुरूस्ती सदर कंपन्यांकडून होत नसल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती करण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे नागरिकांचा तक्रारी वाढल्या आहेत, असे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण यांनी सांगितले.  ‘सीएसआर’अंतर्गत कंपनीने इमारत किंवा वास्तू बांधून दिल्यास त्यांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही त्यांच्याकडेच असावी, अशी अट घालण्याबाबत महापालिका विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्याने सुरू झालेल्या सेलच्या वतीने शहराचा सर्व्हे केला जाणार आहे. त्याचबरोबर कंपनींच्या प्रतिनिधींशी गाठीभेटी घेऊन सीएसआर अंतर्गत निधी उभाण्यावर भर दिला जाणार आहे. झोपडपट्टीत मूलभूत सोई-सुविधांसोबत शिक्षण आणि इतर आवश्यक क्षेत्रात वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या सोई-सुविधांचा प्रत्यक्ष नागरिकांना लाभ व्हावा, या यामागील हेतू आहे, असे पोमण यांनी सांगितले.