Fri, Jul 19, 2019 23:10होमपेज › Pune › भाजप, विरोधकांच्या वादात पालिका अधिकार्‍यांचे सँडविच

भाजप, विरोधकांच्या वादात पालिका अधिकार्‍यांचे सँडविच

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:39AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजप व विरोधकांमध्ये सुरू असलेल्या शह काट शहच्या राजकारणात अधिकारी, कर्मचार्‍यांचे सँडविच होत आहे. 

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले अन भाजपची सत्ता आली. मात्र पाशवी बहुमताच्या बळावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू झाला पालिकेच्या निमंत्रण पत्रिकांमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले मग विरोधकही काट शह देण्यास सज्ज झाले. प्रभाग क्र.25 मध्ये आयोजित कार्यक्रमाबाबत आ. लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार यांना अंधारात ठेऊन सेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी एकाच दिवशी रस्ते, उद्याने आदी सहा कामांचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करवून घेतले.

सदरच्या प्रभागातून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शीले व राष्ट्रवादीचे मयूर कलाटे निवडून आले आहेत. कलाटे व पक्षनेते एकनाथ पवार यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. स्मार्टसिटी कंपनीवर सेनेला न विचारता प्रमोद कुटे यांच्या केलेल्या नियुक्तीवरून दोघांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे कलाटे यांनी महापौरांना पत्र देऊन कार्यक्रम उरकून घेतला.

या कार्यक्रमासाठी महापालिकेने निमंत्रण न दिल्याने आ. लक्ष्मण जगताप हे पक्षनेते पवार यांच्यावर चिडले. हा राग पवार यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यावर काढला. महापौरपदाबरोबरच पक्षनेतेपदही तितकेच महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा, शहाणपणा करू नका या शब्दात त्यांनी चव्हाण यांची निर्भत्सना केली.  मात्र निमंत्रणाची जबाबदारी माझी नाही, जनसंपर्क विभागाची आहे, असे उत्तर देऊन चव्हाण यांनी अंग काढून घेतले. आ. जगताप व पक्षनेते पवार यांनी जनसंपर्क अधिकारी आण्णा बोदडे यांनाही फोनवरून या कार्यक्रमाबाबत तिखट शब्दात जाब विचारला.

या कार्यक्रमाचे कवित्व अद्याप संपलेले नाही.  पालिकेच्या पदाधिकार्‍यांना माहिती न देता परस्पर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा ठपका स्थायी समितीने ठेवला आहे. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाईचे आदेश स्थायीने दिले आहेत. त्यामुळे अधिकारी अडचणीत आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भोसरी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटले. पालिकेत अधिकार्‍यांचा छळ सुरू आहे. त्यामुळे ते बदल्या मागत आहेत. एकेका कामात सहा सहा जण ढवळाढवळ करतात, अधिकार्‍यांनी काम करायचे कसे? या शब्दात स्थानिक नेत्यांनी अधिकार्‍यांच्या व्यथा मांडल्या मात्र भाजप व विरोधकांच्या भांडणात अधिकारी, कर्मचार्‍यांचे मरण झाले आहे एवढे मात्र खरे.

कर्मचारी महासंघावर जबाबदारी

अधिकारी, कर्मचार्‍यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी कर्मचारी महासंघाची आहे. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील सुशीलकुमार लवटे या कनिष्ठ अभियंत्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी काळे फसले त्याचा कर्मचारी महासंघाने निषेधसभा घेऊन निषेध केला मात्र भाजपकडून होणार्‍या त्रासाबद्दल महासंघ गप्प का? असा सवाल केला जात आहे.