Mon, Jul 13, 2020 03:52होमपेज › Pune › डॉ. राय यांच्या पदाला दोन वर्षे मुदतवाढच नाही

डॉ. राय यांच्या पदाला दोन वर्षे मुदतवाढच नाही

Published On: Mar 25 2018 2:12AM | Last Updated: Mar 25 2018 2:08AMपिंपरी  : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर तात्पुरत्या एका वर्षांसाठी डॉ. के. अनिल रॉय यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना  त्या पदासाठी मुदतवाढ मिळालेली नाही. तरीही ते या पदावर गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असल्याची बाब माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेल्या माहितीमध्ये उघड झाली आहे. ज्या पदावर ते अधिकृतरीत्या कार्यरत नाहीत, त्या पदासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायालय व पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केला आहे. 

आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी डॉ. रॉय व डॉ. पवन साळवे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यात पालिका प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने हे प्रकरण अधिक चिघळले आहे. या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवत प्रशासनाने जाणीवपूर्वक चालढकलपणा केल्याचा आरोप होत आहे.  दरम्यान, डॉ. रॉय यांच्या जागी डॉ. साळवे यांना पदोन्नती देण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 23 ऑगस्ट 2017 ला घेतला होता. त्यानुसार विधी समितीने 8 सप्टेंबर 2017 ला ठराव पारित केला. त्या निर्णयाला मंजुरी देण्याची शिफारस समितीने सर्वसाधारण सभेकडे केली होती. दरम्यान, या निर्णयावर डॉ. रॉय यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.

त्यावर न्यायालयाने 2 जुलैपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या विविध मासिक सभेत या प्रकरणचा विषय तहकूब ठेवण्यात आला. मात्र, 20 मार्चच्या सभेत विरोधकांचा विरोध नोंदवून सत्ताधार्‍यांनी डॉ. साळवे यांना पदोन्नतीचा निर्णय मंजूर केला. न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत डॉ. रॉय यांचा पदभार काढता येत नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सभेत स्पष्ट केले आहे. सत्ताधार्‍यांच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. 

या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्ते वाघेरे यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागविली. त्यात तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. गायकवाड हे 31 मे 2013 ला सेवानिवृत्त झाले. पदोन्नती समितीने वैैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्याची शिफारस केली होती. त्यासाठी विधी व पालिका सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र, त्यास विलंब लागणार असल्याने कार्यालयीन कामकाजाचे सोईच्या दृष्टीने त्या पदाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार सोपविण्याचा निर्णय तत्कालिन आयुक्‍त श्रीकर परदेशी यांनी 1 जून 2013 ला घेतला. त्यानंतर डॉ. रॉय यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सदर पदभार देण्यास तत्कालिन आयुक्त राजीव जाधव यांनी 28  एप्रिल 2015 ला मान्यता दिली.

तसेच, त्यानी आयुक्त परदेशी यांचा आदेश निष्कासीत केला.  वर्षभराचा कार्यकाळ संपल्यानंतरही डॉ. रॉय यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा तात्पुरता पदभार कायम आहे. मात्र, संबंधित आयुक्तांनी त्या संदर्भात कोणताही आदेश 2016 पासून आतापर्यंत दिलेला नाही. प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कागदोपत्री त्यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार असल्याचे सिद्ध होत नाही. तरीही त्यांनी उच्च न्यायालयात आपण त्या पदावर कार्यरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालय, तसेच पालिका प्रशासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे.

दरम्यान, तत्कालिन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सदर पद नेमणुकीसाठी शासन मान्यता मिळण्यासाठी 17 ऑक्टोबर 2016 ला शासनास पत्र पाठवले होते. डॉ. रॉय व डॉ. साळवे यांची पात्रता व सेवाज्येष्ठता तपासण्यासाठी सदर प्रकरण पदोन्नती समितीसमोर पुन्हा ठेवून त्यावर फेरनिर्णय घेण्यात यावा, असे उत्तर शासनाचे उपसचिव सं. श. गोखले यांनी 14 मार्च  2017 ला दिले आहे. त्यानुसार आयुक्त हर्डीकर यांनी निर्णय घेऊन तो विधी समितीकडे पाठविला होता. अखेर सत्ताधार्‍यांनी डॉ. साळवे यांना पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे.
 

 

 

tags :Pimpri,news, Pimpri Chinchwad Municipal Corporation's Health Medical Officer Post issue