Wed, Apr 24, 2019 08:01होमपेज › Pune › भाजपशी आतून हातमिळवणी करणार्‍यांची गय नाही 

भाजपशी आतून हातमिळवणी करणार्‍यांची गय नाही 

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:26AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत; मात्र आमच्यातील जे कोणी त्यांच्याशी आतून हातमिळवणी करत असतील त्यांची पक्षश्रेष्ठी गय करणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. त्याबरोबरच विरोधी पक्षनेतेपद  योगेश बहल यांच्याकडे वर्षभरासाठीच दिले असल्याचे सांगत त्यांनी बदलाचे संकेत दिले. 

‘राष्ट्रवादीत आलेली मरगळ जाईना’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केल्याने झोपलेली राष्ट्रवादी खडबडून जागी झाली. माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावांसाठी 425 कोटींची कामे, कचरा गोळा करण्याच्या कामात लोच्या झाल्याचा आरोप केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही चौकशीची मागणी करणारे पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ‘पुढारी’मुळे आम्ही सक्रिय झालो आहोत, असा उल्लेख लांडे यांच्यासह सर्वांनीच केला. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विजय लोखंडे, धनंजय भालेकर आदी उपस्थित होते 

या वेळी लांडे म्हणाले की, उद्योगनगरीत गोरगरीब कष्टकर्‍यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात घरकुल उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्य आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना घरकुल योजनेत पावणेचार लाखांत घर दिले गेले, आता प्रधानमंत्री आवास योजनेत  त्यासाठी 8 लाख रुपये मोजावे लागणार आहेत, ही सामान्यांची पिळवणूक आहे.

शहरातील कचरा उचलण्याचा कामात वाढीव दर दिला गेला असल्याचा आरोप लांडे यांनी केला. पुणे पालिका 1350 प्रतिदिन प्रतिटन, नाशिकला 1400 दर दिला जातो, तर पिंपरी-चिंचवड पालिका मात्र 1800 ते 1900 दर देते, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असे लांडे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या देहू-आळंदी रस्ता, पुणे-आळंदी पालखी मार्ग, केएसबी  उड्डाणपूल  या कामांचे आयते श्रेय भाजप घेत असल्याचा  आरोप लांडे यांनी केला. राष्ट्रवादीचे काही जण भाजपशी आतून संगनमत करत असल्याबद्दल; तसेच पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता संजोग वाघेरे म्हणाले की,  बहल पालिका सभागृहात योग्यरीत्या भूमिका मांडतात; पण काही पत्रकार नेमके तेच छापत नाहीत; मात्र विरोधी पक्षनेतेपद एक वर्षासाठीच होते, आता बदल केला जाणार असल्याचे संकेत वाघेरे व लांडे यांनी दिले.