Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Pune › महापालिका अधिकार्‍यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ करणार

महापालिका अधिकार्‍यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ करणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता येऊन भाजपला एक वर्ष पूर्ण झाले आहे, तरीही पालिकेचे काही मुजोर अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. त्यामुळे विनाकारण विकासकामे व दैनंदिन कामे लालफितीमध्ये अडकून पडली आहेत. अशा अधिकार्‍यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार करण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत सत्ताधार्‍यांनी  दिले आहेत. पालिकेच्या फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी आले आहेत.

मात्र, पालिकेतील काही अधिकारी राष्ट्रवादीचे समर्थक असल्याने ते आपल्या मनाप्रमाणे काम करीत असल्याचे चित्र आहे. शहरात पाणीपुरवठ्यासंदर्भात असंख्य तक्रारी आहेत. कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, दूषित पाणीपुरवठा, पाणीच न येणे अशा तक्रारींमुळे विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकही वैतागले आहेत. त्यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांच्या वारंवार बैठका घेऊन सक्‍त सूचना देऊनही त्यावर तत्काळ कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

त्याचाच परिणाम, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याच एका नगरसेविकेने पाण्यासाठी टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर नेहमी देतात; मात्र गेल्या वर्षभरात त्यांनी एकाही अधिकारी व कर्मचार्‍यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी सोकावले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पालिकेच्या सर्व अधिकार्‍यांचे मागील एका वर्षातील कामाचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार करण्यात येणार आहे.

त्यांनी एका वर्षात केलेले काम व रखडलेली कामे आणि तक्रारींची संख्य आदी सर्वंकष बाबींचा त्यामध्ये समावेश असणार आहे. ‘रिपोर्ट कार्ड’च्या आधारे कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाईच केली जाणार असल्याचा सत्ताधार्‍यांनी निर्णय घेतला आहे. वर्षभर सूचना देऊनही अधिकार्‍यांच्या कामात सुधारणा होत नसल्याने सत्ताधारी या अंतिम निर्णयावर येऊन पोचले आहेत. त्यामुळे कोणत्या अधिकार्‍यांवर कारवाई होते, का उगाच बाऊ केला जात आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.   
 

 

tags ;Pimpri,news,Pimpri,Chinchwad, Municipal, Corporation,Report ,card,municipal,officials,


  •