Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Pune › नियोजनाअभावी ‘पवनाथडी’चा बोजवारा

नियोजनाअभावी ‘पवनाथडी’चा बोजवारा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:40AM

बुकमार्क करा
पिंपरी ः वार्ता

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या  उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे गुरुवारी (दि.4) थाटात उद्घाटन करण्यात आले; मात्र ढिसाळ नियोजनाअभावी अगदी पहिल्या दिवसापासूनच बचत गटांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले; तसेच स्टॉलमधील महिलांमध्येच अनेक वादविवाद झाले. त्यामुळे पवनाथडी जत्रेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले, 

नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर 4 जानेवारीपासून पवनाथडी जत्रेस सुरुवात झाली; मात्र मूलभूत सुविधांचा अभाव व ढिसाळ नियोजन; तसेच पक्षांतर्गत वादावादी यावरून ही जत्रा चांगलीच गाजणार असे चित्र आहे. दर वर्षी जत्रेत चारशे स्टॉल्स असतात. यंदा 436 स्टॉल्समध्ये एकात दोन याप्रमाणे एकूण 872 महिला बचत गटांना वाटप करण्यात आले आहे.  यात वस्तू विक्रीचे  434, शाकाहारी 221, तर मांसाहारी 217 असे एकूण 872 स्टॉल्स आहेत. जत्रेत विविध भागातील एकाहून एक स्वादिष्ट असे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत; मात्र अगदी उद्घाटनानंतरच अनेक महिला बचत गटांना टेबलच मिळाले नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे; तसेच वारंवार तक्रार करूनही दुसर्‍या दिवसापर्यंत टेबल मिळाले नसल्याने अनेकांवर पदार्थ खराब होण्याची वेळ आली; तसेच एका स्टॉलमध्ये दोन दोन तीन-तीन टेबल, तर काही स्टॉल्समध्ये एकही टेबल नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळाली. 

अनेकांना टेबल न मिळाल्याने महिला तशाच बसून होत्या, तर ज्यांच्याकडे अधिक टेबल-खुर्च्या होत्या त्यांना विचारले असता टेबल व खुर्च्या भाड्याने आणल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने पुरविलेल्या तर काहींनी साखळीने टेबल बांधून ठेवल्याचे पाहायला मिळाले, तर याउलट अनेक ठिकाणी विद्युत बोर्डच नसल्याने मिक्सर लावता येत नसल्याची तक्रार महिलांनी केली, तर अनेक जण मिक्सर सुरू होण्यासाठी कोठे सोय होते का यासाठी वणवण फिरताना दिसले. मागील वर्षी भोसरी येथे झालेल्या गैरसोयी यंदा पीडब्ल्यूडी मैदानावरही  पाहायला मिळाल्या.