Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Pune › महापालिकेचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही

महापालिकेचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देहूरोड :उमेश ओव्हाळ

देहूजवळील बोडकेवाडी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यातील जागा पंपिंग स्टेशनसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला हवी आहे. तशी मागणी करणारे पत्र नुकतेच पालिकेच्या वतीने प्राधिकरणाला पाठविण्यात आले होते. मात्र, देहू ग्रामस्थांचा पालिकेच्या या निर्णयाला विरोध आहे. ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला गृहीत धरून पालिका मनमानी पध्दतीने काहीही निर्णय घेणार असेल तर त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. 

देहू ग्रामपंचायत हद्दीतील बोडकेवाडी येथे पूर्वीपासून जीवन शासनाची पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, गेली काही वर्षे विविध कारणांनी ही योजना रडतखडत सुरू होती. नुकतेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून येथे नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. मात्र, या योजनेसाठी घेण्यात आलेल्या जागेचा मोबदला अद्यापही शेतकर्‍यांना मिळाला नाही. अशातच योजनेलगतची मोकळ्या जागेची पालिकेने प्राधिकरणाकडे मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने आंद्रा व भामा-आसखेड धरणांतून पालिकेसाठी 97.661 दशलक्ष घनमीटर इतका पाणी कोटा 2014 मध्येच मंजुर केला असून याबाबतचा शासन निर्णयही पालिकेने कळविला आहे.  पालिकेच्या या मागणीवरून देहू ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. देहूला पालिकेत समाविष्ट करण्याचा आणि आता पंपींग स्टेशन उभारण्यासाठी जागेच्या मागणीचा असे दोन्ही निर्णय पालिकेने देहू ग्रामस्थांना गृहीत धरून घेतले.

ग्रामस्थांवर हे निर्णय लादता येणार नाहीत. जबरदस्ती झाल्यास पंचक्रोशीतून त्यास विरोध केला जाईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. बोडकेवाडी येथे नदीतून ज्या भागात पाणी उपसा केला जातो, ती जागा मर्यादित आहे. उन्हाळ्यात बर्‍याचवेळा येथील पाणी आटल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्यामुळे या भागात पालिकेचे पंपीगस्टेशन यशस्वी होणार नाही. शिवाय, अधिकचा उपसा झाल्यास स्थानिक, भाविक आणि शेती व्यवसाय अडचणीत येईल. पालिकेच्या या प्रयत्नांना देहूकरांचा तीव्र विरोध असून प्रसंगी पक्ष, राजकारण बाजूला ठेवून गावासाठी सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असे  माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे यांनी सांगितले.

देहू हे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्याची स्वतंत्र ओळख असून ती पुसण्याचा कुठलाही प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडला पाणी नेण्यासाठी आधी पवना आणि नंतर भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी उचलण्याचा प्रयत्न तेथील स्थानिकांनी हाणून पाडल्यामुळे पालिकेकडून देहूतून पाणी उचलण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र हा निर्णय यशस्वी होऊ देणार नाही, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आहे. 
 


  •