Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Pune › पालिकेकडे केवळ 42 मीटरची स्कायलिफ्ट

पालिकेकडे केवळ 42 मीटरची स्कायलिफ्ट

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:53AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 70 मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधण्यास  परवानगी दिली असल्याने शहरातील अनेक भागांत त्या उंचीच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत; मात्र महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे केवळ 42 मीटर उंचीपर्यंत पोहचून आग विझविण्याचे  हायड्रोलिक स्कायलिफ्ट वाहन आहे. त्यामुळे 42 मीटरवरील उंच इमारतीमधील आग किंवा एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने मदत पोहचविण्यास अग्निशामक दल असमर्थ असल्याचे धक्कादायक  चित्र आहे.  

मुंबई परिसरात नुकत्याच आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे टोलेजंग उंच इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी अद्ययावत वाहने व साधनसामग्री आहे. अधिक उंचीच्या इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी स्कायलिफ्ट वाहने आहेत. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, मोशी, चर्‍होली या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. इतर परिसरातही मुंबईप्रमाणे टोलेजंग इमारती मोठ्या संख्येने बांधल्या जात आहेत. 

असे असले तरी, पिंपरी-चिंचवड शहरात एखाद्या उंच इमारतीमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाकडे केवळ 42 मीटर उंचीची स्कायलिफ्ट वाहन आहे. एखादी  दुर्घटना घडल्यास त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्या उंचीची लिफ्ट वाहन शहरात उपलब्ध नाही. त्यामुळे त्यात नाहक  नागरिकांचा जीव जाण्याचा धोका आहे. वाढत्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत अग्निशामक दलाच्या सुविधा असणे अत्यावश्यक आहे. ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने सक्षम असणे गरजेची बाब आहे. मात्र, त्याबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. 


65 ते 70 मीटरपर्यंत पोहचणारी स्कायलिफ्ट खरेदीबाबत चर्चा 

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक उंच-उंच इमारती उभ्या राहत आहेत. अशा इमारतींमध्ये एकादी दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 65 ते 70 मीटर उंचीपर्यंत पोहचणारी हायलेव्हल स्कायलिफ्ट वाहन (टीटीएल) खरेदीबाबत महापालिका नियोजन करीत आहे. इतका उंचीचा स्कायलिफ्ट प्लॅटफार्म असलेले वाहन तयार करणार्‍या चार कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यात या स्कायलिफ्टचे सादरीकरण केले असून, तसे प्रस्ताव दिले आहेत.  आयुक्तांच्या सहमतीने या लिफ्टच्या खरेदीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.  

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मुख्य केंद्र करणार

पिंपरी-चिंचवड शहराचे अग्निशामक दलाचे मुख्य केंद्र संत तुकारामनगर, पिंपरी येथे आहे. हे केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्याचे नियोजन आहे. अग्निशामक दलाचे बंब व इतर वाहने, साहित्यसामग्री, प्रशिक्षण व संचलनासाठी जागा, निवासस्थान आदी सामावेल अशा ऐसपैस जागेचा शोध घेतला जात आहे. काही जागांची पाहणी केली आहे. लवरकच जागा निश्‍चित करून त्या ठिकाणी शहराचे मुख्य अग्निशामक दल सुरू केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.