Mon, Jun 17, 2019 18:36होमपेज › Pune › पालिकेतील अधिकार्‍यांच्या बढत्यांमध्ये ‘अर्थपूर्ण‘ व्यवहार

पालिकेतील अधिकार्‍यांच्या बढत्यांमध्ये ‘अर्थपूर्ण‘ व्यवहार

Published On: Mar 24 2018 1:53AM | Last Updated: Mar 23 2018 11:23PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव व उपअभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंतापदी बढती देण्याचे प्रस्ताव अर्थपूर्ण देवाणघेवाणीतून झाले आहेत, असा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी  केली आहे.

याबाबत भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय हे कार्यरत आहेत,  तर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी हे देखील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. या दोघांनी शैक्षणिक अर्हता व वरिष्ठता या मुद्द्यावरून आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर दावा केला आहे. यावर डॉ. रॉय यांच्याऐवजी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांना आरोग्य प्रमुख करण्याची शिफारस विधी समितीने सर्वसाधारण सभेला केली. त्या वेळी रॉय यांनी हा प्रस्ताव आर्थिक  देवाणघेवाणीतून झाला आहे, अशी लेखी तक्रार आयुक्तांकडे केली होती.

तसेच, विधी  समितीच्या या ठरावास  डॉ. रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात न्यायालयाने याप्रकरणी ‘जैसे थे’चा आदेश पालिकेला दिला होता. असे असताना न्यायालयाचा आदेश खुंटीला टांगत महापालिका सभेत सत्ताधारी पक्षाने पाशवी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला. याप्रकरणी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून, दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. 

पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसूचनांद्वारे अधिकार्‍यांना बढत्या देत कहर केला होता.  भाजपनेही त्यांचाच कित्ता गिरविला आहे. भाजप पदाधिकार्‍यांनीही उपसूचनांद्वारे अधिकार्‍यांना बढत्या देण्याचा सपाटा लावला आहे. 

मार्च महिन्याच्या महासभेत स्थापत्य विभागातील नऊ उपभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात आली. या बढत्यांमागे दोन पदाधिकार्‍यांचे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. अभियंता संवर्गात पदवी आणि पदविका, असा शैक्षणिक अर्हतेचा वाद सुरू असतानाही सत्ताधार्‍यांनी बढत्यांमध्ये रस दाखविला आहे. सत्ताधार्‍यांना अधिकार्‍यांच्या बढत्यांमध्ये मोठा रस आहे. डॉक्टरांच्या बढत्यांचे विषय विधी समितीने रोखून धरले. टीका झाल्यानंतर ते  मंजूर करण्यात आले. गेल्या काही सर्वसाधारण सभांमध्ये भाजपने उपसूचनांद्वारे अधिकार्‍यांना बढत्या देण्याचा सपाटा लावला आहे. फेब्रुवारीच्या महासभेत स्थापत्य विभागातील अधिकार्‍यांना आणि मार्च महिन्याच्या मंगळवारी (दि.20) झालेल्या महासभेत देखील स्थापत्य विभागातील नऊ उपभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात आली. 

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

महापालिका अभियंता संवर्गात सध्या पदवी आणि पदविका असा शैक्षणिक अर्हतेचा वाद आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही शैक्षणिक अर्हतेचा वाद निकाली काढत कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांची एकच सेवाज्येष्ठता यादी करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच सत्ताधार्‍यांनी बढत्या दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव व उपभियंत्यांना उपसूचनेद्वारे कार्यकारी अभियंता बढती देण्याचे प्रस्ताव अर्थपूर्ण देवाणघेवाण करून मंजूर करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून यातील दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri News, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Healthcare Medical Officer promotion,