Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Pune › सव्वाचारशे कोटींची ‘रिंग’, त्यात 90 कोटींचा भ्रष्टाचार

सव्वाचारशे कोटींची ‘रिंग’, त्यात 90 कोटींचा भ्रष्टाचार

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:32AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 425 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा 15 ते 20 टक्के जादा दराने मंजूर करून सुमारे 90 कोटी अधिकने काम दिले गेले आहे. जागा ताब्यात नसताना व निधीची तरतूद नसतानाही घाईगडबडीने निविदा काढून जनतेच्या कररूपी पैशांचा अपव्यय करण्यात आला आहे. आयुक्त, भाजपा पदाधिकारी, आमदार व ठेकेदारांनी हा कारभार केला असून, ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खाते, प्राप्तिकर खात्यासह मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडेही तक्रार करण्यात येणार आहे. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

यासंदर्भात शनिवारी (दि. 13) झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहर संघटिका सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट व नगरसेवक उपस्थित होते. खासदार आढळराव पाटील म्हणाले की, महापालिकेत भाजपाचा गेल्या 11 महिन्यांपासून भ्रष्ट कारभार सुरू आहे. 425 कोटींच्या कामांमध्ये 15 ते 20 टक्के जादा दराने निविदा स्वीकारली गेली आहे.

मागील दोन वर्षांच्या कामांच्या निविदा पाहता सदर ठेकेदारांनी 4 ते 5 टक्के दराने निविदा भरल्या आहेत. रस्त्यांच्या कामांचे एस्टिमेट मुळात जादा दराने तयार करण्यात आले, तरीही ठराविक 12 ठेकेदारांना 15 ते 20 टक्के जादा दराने काम दिले गेले आहे. संबंधित ठेकेदारांनी सपोर्टिंग निविदा भरली आहे. या कामासाठी 60 टक्के जागा अद्याप ताब्यात नाही. अर्थसंकल्पात या कामाच्या निधीची तरतूद नाही. असे असतानाही  त्यास मंजुरी देण्यामागे भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

राष्ट्रवादीला चोर म्हणून ओरडणारे भाजपा आता दरोडेखोराच्या भूमिकेत आहेत, अशी टीका आढळराव यांनी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खाते, प्राप्तिकर विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. भोसरीतील शीतलबाग कॉलनी येथील पादचारी पुलास वाढीव खर्च केल्याप्रकरणी सीआयडीकडे केलेल्या तक्रारीवर कार्यवाही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.  खासदार बारणे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजपा आपल्या सत्ताकाळात तो निष्फळ ठरल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवूनच रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या.

धरणात मुलबक पाणी असताना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठ्याची मोठी कामे करून घेण्यात आली. कचरा समस्या दाखवून मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याचा कट भाजपाने केला आहे. भाजपाचा गैरकारभाराचा पोलखोल शिवसेना करणार आहे. प्रसंगी जनआंदोलन उभे केले जाईल. एखाद्या मोठ्या कामाची तरतूद नसताना त्यास मंजुरी दिली जात आहे. नंतर निधी वर्ग करून त्यातून टक्केवारी गोळा केली जात असल्याचा आरोप खा. बारणे यांनी भाजपावर केला.  राज्य शासनाने सोलापूर, नवी मुंबई व पुण्याप्रमाणे या कामांचीही चौकशी करावी, अशी मागणीही केली.