Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 04 2018 11:59PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. महापौर निवडणुकीत जाधव यांना 80 मते तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना 33 मते पडली.  सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीचे  प्रत्येकी 3 नगरसेवक अनुपस्थित होते. तर, अपक्ष पाच नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले.  शिवसेना तटस्थ राहिली. उपमहापौर निवडणुकीत भाजपचे सचिन चिंचवडे यांना 79 तर राष्ट्रवादीच्या तापकीर यांना 32 मते मिळाली. सेनेच्या उपस्थित 7 सदस्यांबरोबरच मनसेचे सचिन चिखले व राष्ट्रवादीचे रोहित काटे असे एकूण 9 जण तटस्थ राहिले.

महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यासाठी शनिवारी (दि. 4) महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहिले.

सभेचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवत मतदान घेण्यात आले. 128 नगरसेवक असलेल्या सभागृहात 120 नगरसेवक उपस्थित होते. अनुपस्थित नगरसेवकांमध्ये भाजपचे शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, रवी लांडगे, राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, सेनेचे प्रमोद कुटे, सचिन भोसले यांचा समावेश होता. या निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव  यांनी 80 मते घेत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना 33 मते मिळाली. सेनेचे 9 पैकी 7 उपस्थित नगरसेवक तटस्थ राहिले.

उपमहापौरपदासाठी भाजपचे सचिन चिंचवडे व राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्यात लढत झाली. 111 जणांनी मतदान केले. चिंचवडे यांना 79 तर तापकीर यांना 32 मते मिळाली. नऊ सदस्य तटस्थ राहिले, त्यात सेनेच्या उपस्थित 7 नगरसेवकांसह मनसेचे सचिन चिखले व राष्ट्रवादीचे रोहित काटे यांचा समावेश होता.

रिक्षाचालक ते महापौर 

महापौरपदी निवड झालेले 36  वर्षीय राहुल जाधव यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. शेती व वर्कशॉप हा त्यांचा व्यवसाय आहे. मागील  टर्मला मनसेचे नगरसेवक होते. या वेळी त्यांनी पालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. जाधववाडी प्रभाग क्र. 2 मधून ते निवडून आले आहेत. रिक्षाचालक ते महापौर असा त्यांचा प्रवास झाला आहे. आ. महेश लांडगे यांचे ते कट्टर समर्थक आहेत.

महापौर आले महात्मा फुले यांच्या वेशात!

महापौर निवडणुकीसाठी राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करून महासभेत आले. तर, त्यांच्या पत्नीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महापौरपदी निवड झाल्यावर त्यांनी नगरसेवकांचे जाऊन आभार मानले. त्यावेळी त्यांच्या समवेत फोटोचा मोह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही आवरला नाही.