Thu, Jul 18, 2019 06:46होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 2:07AM | Last Updated: Jan 04 2018 1:00AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात बाजारपेठा, पेट्रोल पंप बुधवारी कडकडीत बंद होते. सकाळी दहापर्यंत काही भागांत दुकाने सुरू होती; मात्र जमावांनी जाऊन ती बंद करायला लावली. पिंपरीतील आंबेडकर चौकात सकाळी साडे अकरा ते सायंकाळपर्यंत मोठी गर्दी होती. या ठिकाणी तणावाचे वातावरण होते; तसेच रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जमावांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. 

आंबेडकरी संघटनेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (दि. 3) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील वाकड, चिंचवड, काळेवाडी, सांगवी, भोसरी, निगडी आणि पिंपरी परिसरातील प्रमुख बाजारपेठा सायंकाळी उशिरापर्यर्ंत बंद होत्या. आंबेडकरी संघटना आणि भीमसैनिकांनी आपआपल्या परिसरात मोर्चे काढून घटनेचा निषेध केला आणि भीमा कोरेगाव दंगलीमागे हात असणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील वेगवेगळ्या परिसरातील संघटना, भीमसैनिक पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येणार असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळी साडे अकरापर्यंत या चौकातून सुरळीत वाहतूक सुरू होती; मात्र त्यानंतर गर्दी वाढू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली. या चौकात एकामागून एक अशा वेगवेगळ्या संघटना घोषणाबाजी करत चौकात दाखल झाल्या. यामुळे चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावातील काही तरुणांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारतीसमोरील; तसेच कमला क्रॉस बिल्िंडगसमोरील वाहनांवर दगडफेक केली. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला; तसेच ग्रेडसेप्रेटरमधून जाणार्‍या वाहनांच्या दिशेने दगडफेक केली. या चौकात मोठ्या प्रामाणात पिंपरी पोलिस, इतर पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखेचे पोलिस; तसेच राज्य राखीव दलाचे पोलिस तैनात करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांनी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बंद मागे घेतला. त्यानंतर सायंकाळी हळूहळू व्यवहार पूर्वपदावर आले.

मुस्लिम संघटनांचा पाठिंबा : मुस्लिम संघटनांनीही आंबेडकरी संघटनांना  पाठिंबा दिला. मुस्लिम पदाधिकारी चौकात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे रोखण्याचा प्रयत्न: भीमसैनिकांनी पिंपरी रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. भीमसैनिकांनी लोहमार्गावर; तसेच स्थानकावर घोषणाबाजी केली.