Sun, Mar 24, 2019 23:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › धक्कादायक... एकाच दिवशी  चार अत्याचार; बलात्काराचे गुन्हे

धक्कादायक... एकाच दिवशी  चार अत्याचार; बलात्काराचे गुन्हे

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:51AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्यात एकाच दिवशी चार बलात्कार, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर; तसेच दोन अल्पवयीन मुलींवरही लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले,  तर एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. सांगवी पोलिस ठाण्यात एकाच दिवशी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे खळबळ उडाली आहे. 

एका 14 वर्षांच्या मुलीवर नाशिक फाटा येथील नदीपात्राजवळ व राजस्थान येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी अजय नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका सामजिक कार्यकर्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय याने पीडित मुलीला रात्रीच्या वेळी बोलण्यासाठी बोलावून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला राजस्थान येथे भावाच्या घरी नेऊन तिथेही अत्याचार केले. हा प्रकार आठ महिन्यांपूर्वी घडला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी हरी गोविंद राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. राठोड याने पीडित मुलगी एकटी घरात असताना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले; तसेच याबाबत कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. पिंपळे सौदागर परिसरात राहणार्‍या एका 17 वर्षांच्या मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून गणेश मारुती मस्के याने लैंगिक अत्याचार केले.

ऑगस्ट महिन्यात पीडित मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने गैरफायदा घेतला. त्यानंतर पीडित मुलीला कात्रज येथील लॉजवर नेऊन तेथेही अत्याचार केले. त्यानंतर जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या मुलीला दिल्या. संतोष महाले याच्याविरुद्ध 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महाले याने लग्नाचे आमिष दाखवून 2008 पासून आजपर्यंत सांगवी, बाणेर, पुणे, पंचशीलनगर, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, गुजरात येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. पीडित महिलेस विश्‍वासात घेऊन गावी शेती घेण्यासाठी सहा लाख रुपये; तसेच महिलेचा मोबाईल आणि 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. महाले याच्या नातेवाइकांनी महिलेस लोखंडी रॉडने, काठीने मारहाण करून  जखमी केले. महिला अत्याचाराच्या घटना  आणि एकाच दिवशी सांगवी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळेे परिसरात खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.