Thu, Jun 27, 2019 18:26होमपेज › Pune › शहर भाजपासाठी कसोटीचा काळ

शहर भाजपासाठी कसोटीचा काळ

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 10:43PMपिंपरी : संजय शिंदे 

मराठा आरक्षणावरून सुरू झालेले आंदोलन, अनधिकृत बांधकामाबाबत किती दंड करायचा याचे सर्वाधिकार महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतावेच त्यातून किती दंड आकारायचा यावरून पालिका पदाधिकार्‍यांपुढे  निर्माण  झालेला पेच, पालिकांतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दोन आमदारांमधील कुरघोडीचे राजकारण, ज्येष्ठ पदाधिकार्‍यांच्या पुनर्वसनाबरोबरच महापौर निवडीचा पेच, विविध प्रश्‍नांवरून विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडण्यावर दिलेला भर यामुळे सर्वच क्षेत्रांत पिंपरी-चिंचवड भाजपचा सध्या कसोटीचा काळ असल्याची चर्चा होत आहे. 

सोमवारी (दि.23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्राहालयच्या इमारतीच्या कामाचे उद्घाटन करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह आहे; मात्र हा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकविण्याचे जोखमीचे काम  शहराध्यक्षांबरोबरच त्यांच्या टीमला करावयाचे आहे. पक्षात ‘अच्छे दिन’ आहेत असे पदाधिकारी, कार्यकर्ते ठामपणे सांगत असल्याची ही नाण्याची एक बाजू आहे; मात्र नाण्याची दुसरी बाजू खरेच पहिल्या बाजूला मिळती-जुळती आहे का? याबाबत ऊहापोह केला असता शहर भाजपात सर्वच क्षेत्रात कसोटीचा काळ असल्याचे पहावयास मिळत आहे.

राज्यभर सुरू असलेल्या ‘मराठा आरक्षणा’चा प्रभाव औद्योगिक नगरीमध्येही जोरदारपणे घोंगावत आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून पोट भरण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांची संख्या शहराच्या लोकसंखेच्या पटीत तेवढीच मोठी आहे. त्यामध्ये सर्वजाती धर्माचे लोक असले तरी मराठी टक्काही मोठा आहे. पंढरपुरात जाऊन विठ्ठलाची पूजा करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठी समाजामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्याचे ‘लोण’ पिंपरी-चिंचवडमध्येही पसरले आहे. त्याचा फायदा करुन घेण्याच्या दृष्टीने भाजपच्या विरोधातील पक्ष सरसावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, सहयोगी आ. महेश लांडगे, खा. अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या एकसंघ भूमिकेमुळे पालिकेत सत्तांतर होऊन भाजपने महापालिकेवर कमळ फुलविले. शहरवासियांच्या प्रश्‍नांचा निपटारा होईल, अशी आशा सत्ताधार्‍यांकडून शहरवासियांना आहे. त्यापैकी अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकार ठरविणार असल्याचे आश्‍वासन शहरातील पदाधिकार्‍यांकडून शहरवासियांना देण्यात येत होते; मात्र सोमवारी मुख्यमंत्र्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंड आकारण्याचे सर्वाधिकार पालिकेला आहेत असे सुतावेच करत नियमितीकरणाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात टोलविला. त्यामुळे दंड किती आकारला जावा यावरूनही राजकारण होणार हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. 

पदाधिकार्‍यांच्या पुनर्वसनावरून घालमेल

शहर भाजपातील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांच्या पुनर्वसनावरून पक्षांतर्गत घालमेल सुरू आहे. आमदारकीवर वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असूनही केंद्रीय समितीतून  निर्णय बदलण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पद मिळत नाही तोपर्यंत संबंधित व त्यांचे कार्यकर्ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तर शहर स्तरावरील कुरघोडीच्या राजकारणामुळे काही ज्येष्ठांचे महामंडळ अध्यक्षपदासाठी अंतिम होऊनही  ते नाव जाहीर होता-होता थांबल्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठांची ही अवस्था असेल तर, आपले काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे एकसंघपणामुळे पालिकेत सत्ता मिळविली; मात्र ही एकसंघता कुरघोडीच्या राजकारणामुळे खिळखिळी होत असल्याने दुरून भाजपात अच्छे दिन दिसत असले तरी भाजपचा सर्वच क्षेत्रांत कसोटीचा काळ दिसत आहे.