Tue, Jun 18, 2019 19:28होमपेज › Pune › उद्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांचा बेमुदत संप

उद्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांचा बेमुदत संप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ; प्रतिनिधी

स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन तुटपुंजे आहे. त्यामुळे त्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी 1 एप्रिलपासून स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 220 स्वस्त धान्य दुकानदार यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन व ऑल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

फेडरेशनचे अध्यक्ष गजाजन बाबर व महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी नुकतीच बैठक घेऊन संपाचा निर्णय घेतला. मुंबई आझाद मैदान येथे 1 लाख दुकानदारांच्या उपस्थितीत हा संप करण्याचा निर्धार झाला आहे. शासनाने ई-पॉस मशिन दिली आहे; मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन कमी मिळत आहे.

त्यांना परवडत नाही. त्यामुळे दुकानदारांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. दरम्यान, राज्य सरकारने दमदाटीने सचिवामार्फत डीएसओ, तहसीलदार, अन्‍नधान्य वितरण अधिकारी यांना शासनामार्फत परिपत्रक काढून दुकानदारांनी मोर्चात येऊ नये यासाठी दडपण आणल्याचा आरोप संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. आझाद मैदान येथे सकाळी 10 ते सायंकाळी सव्वासातपर्यंत हा संप केला जाणार आहे. या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती या वेळी प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.
 


  •