Wed, May 22, 2019 15:24होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी उफाळली

दापोडी-निगडी ‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी उफाळली

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:31AM

बुकमार्क करा
.पिंपरी प्रतिनिधी

अनेक वर्षे रखडलेल्या दापोडी ते निगडी ‘बीआरटी’ मार्गावरील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. हा मार्ग सुरू करण्यासाठी मंगळवारी (दि. 2) ‘बीआरटी’ बस सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यानुसार महापौर व पक्षनेत्यांनी बस सेवा सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला आहे; मात्र सुरक्षेच्या उपाययोजना केल्याशिवाय ‘बीआरटी’ सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्षांनी घेतल्याने भाजपमधील गटबाजी समोर आली आहे.  

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडीपर्यंत 12.50 किलोमीटर अंतर मार्गावर दुहेरी पद्धतीने ‘बीआरटी’ बस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प 5 पेक्षा अधिक वर्षांपासून रखडला  आहे. या मार्गावर नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास व्हावा, प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग व्हावा याकरिता ‘बीआरटी’ मार्ग विकसित करण्यात आला आहे. दापोडी ते निगडी ‘बीआरटी’ मार्गावरील सर्व कामे अंतिम टप्पात आहेत. उर्वरित किरकोळ कामे आठवडाभरात पूर्ण करण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. 

आठवडाभरात उर्वरित कामे पूर्ण होतील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ‘बीआरटी’ मार्गावर मंगळवारी पीएमपी बसची चाचणी घेण्यात आली. त्यात महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते  एकनाथ पवार, आयुक्त हर्डीकर व नगरसेवकांनी सहभाग घेतला. ‘बीआरटी’ सेवा लवकर सुरू करावी, अशी सूचना महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी केली.  
दरम्यान, सुरक्षेच्या उपाययोजना केल्याशिवाय दापोडी-निगडी ‘बीआरटी’ मार्ग सुरू करण्यात येऊ नये.

या मार्गाला यापूर्वीही आम्ही विरोध केला आहे. या मार्गावरील वाहनचालकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हा मार्ग सुरू करण्यापूर्वी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण कराव्यात; तसेच सुरक्षेच्या उपाययोजना न करता ‘बीआरटी’ मार्ग सुरू केल्यास त्याला विरोध करण्यात येईल, असी भूमिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली आहे. त्यामुळे दापोडी-निगडी ‘बीआरटी’ बस सेवा सुरू करण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडल्याचे उघड झाले आहे.