Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Pune › पिंपरी महापालिकेचा कारभार समाजसेवकांविना

पिंपरी महापालिकेचा कारभार समाजसेवकांविना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना हा विभाग थेट नागरिकांशी संबंधित आहे. विभागाचे कामकाज सुरळीत व गतिमान होण्यासाठी 4 समाजसेवकांची पदे मंजूर आहेत. मात्र, ती ऑगस्ट 2016 पासून भरण्यात न आल्याने विभागाचे कामकाज खोळंबून राहात असून, त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभाग गतिमान करण्यासाठी 4 समाजसेवकांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने शहरातील नागरिक, विद्यार्थी व महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय, महिला व बालकल्याण तसेच, मतिमंद, नि:समर्थ (दिव्यांग) यांना योजनेचा लाभ देण्यात येतो. या विविध योजनांचे अर्ज स्वीकृती, योजनांची माहिती देणे, अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे, अपात्र अर्जांची पूर्तता करून घेणे, प्रमाणित करणे, प्रशिक्षण केंद्राना भेटी देणे आदी कामकाज  समाजसेवक करतात. 

सदर कामांसाठी नागरवस्ती विकास योजना विभागामध्ये ‘समाजसेवक’ ही 4 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 3 पदे सन 1998 पासून भरण्यात येत आहेत. मात्र, ऑगस्ट 2016 पासून आतापर्यंत  समाजसेवकांची तीनही पदे रिक्त आहेत. त्यामुळे सदर कामे करण्यास संबंधित विभागास अडचणी येत आहेत. या विभागाकडे 30 विविध कल्याणकारी योजनेसाठी वर्षांला दोन ते तीन लाख अर्ज प्राप्त होतात. परिणामी, कामे तुंबून राहात आहेत. त्यामुळे योजना मुदतीत पूर्ण करण्यासाठी विभागातील इतर अधिकार्‍यांना कसरत करावी लागत आहे. सध्या केवळ एकच समाजसेवक कार्यरत असून, त्यावर या विभागाचा कामाचा प्रचंड ताण पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारणांमुळे नागरवस्ती विभागाच्या कामकाजावर नगरसेवक नाखुश आहेत. 

सदरची पदे भरण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही प्रलंबित आहे. यासंदर्भात आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक झाली. बैठकीत आयुक्तांनी महिला व बालकल्याण विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी असलेल्या समुपदेशन केंद्रांची संख्या प्रभागानुसार वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या कार्यालयाकडील समाजसेवकांच्या कामात वाढ होणार आहे. त्यामुळे 3 किंवा 4 समाजसेवक तातडीने भरणे आवश्यक आहे. ही पदे 6 महिने मानधन तत्त्वावर भरली जातात. मात्र, ऑगस्ट 2016 पासून ही पदे भरण्यात आली नाहीत. पालिकेच्या प्रशासन विभागाच्या हजगर्जीपणामुळे ही पदे न भरल्याने नागरवस्ती योजना विभाग बदनाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरवस्ती विभागातील योजनांसाठी विशेष प्रकारचे कामकाज व कामकाजाचा व्याप पाहता ‘समाजसेवक’ पदे भरण्यात प्राधान्याने कार्यवाही करण्याची मागणी संबंधित विभागाच्या वतीने तब्बल 5 वेळा करण्यात आली आहे. मात्र, त्यावर प्रशासन विभाग कार्यवाही करण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 
 

 

 

tags : Pimpri,news, 4 Demands, for ,appointment, of, social ,workers,in Pimpri,Chinchwad, Municipal, Corporation,


  •