Sun, Jul 12, 2020 15:37होमपेज › Pune › पिंपरीत विविध कामांसाठी  ४० कोटींच्या खर्चास मंजुरी

पिंपरीत विविध कामांसाठी  ४० कोटींच्या खर्चास मंजुरी

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:17AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारील मोकळ्या जागेत सिटी सेंटर विकसित करण्यासह  शहरातील विविध विकासविषयक कामांसाठी येणार्‍या सुमारे 40 कोटी 44 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास बुधवारी (दि.20) झालेल्या स्थायी समितीच्या सभेने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा सीमा साळवे होत्या. ट्रॅफिक वॉर्डन आणि स्मशानभूमीसाठी मदतनीस नियुक्ती करताना ‘जीएसटी’ पालिकेने भरावा, या अटीमुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे दोन्ही विषय तहकूब करण्यात आले. 

दीडशे ट्रॅफिक वॉर्डन, 715 रखवालदार व पालिका शाळांसाठी रखवालदार नियुक्तीचा ठेका कोणत्या संस्थेला दिला आहे, त्याची माहिती प्रस्तावामध्ये नसल्याने ते तीनही विषय तहकूब केले गेले; तसेच न्यायालयाशी संबंधित 3 विषयही तहकूब करण्यात आले. मोरवाडीमधील सायन्स पार्कशेजारील मनपाच्या जागेत सिटी सेंटर विकसित करण्यासाठी व सीमाभिंत बांधण्यासाठी 1 कोटी 93 लाख 27 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील रस्टन कॉलनी, लक्ष्मीनगर व यशोपुरम परिसरातील जलनिस्सारण कामासाठी 40 लाख 94 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 27 मध्ये पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्तेदुभाजक, पदपथ व मनपा इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 32 लाख 21 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. बोपखेल फाटा ते आळंदी रस्त्यावर डेडिकेटेड लेनसाठी 4 कोटी 78 लाख 22 हजार,  प्रभाग क्रमांक 3 येथील अनाथ आश्रम ते देहू-आळंदी रस्त्याला मिळणार्‍या 30 मीटर डीपी रस्त्यासाठी 1 कोटी 84 लाख 85 हजार,  प्रभाग क्रमांक 6 मोशी येथील गट क्रमांक 57 ते 61 पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्त्यासाठी  4 कोटी 52 लाख 82 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.    

प्रभाग क्रमांक 3 चिखली येथील पाटीलनगर, बगवस्ती, सोनवणे वस्ती, मोरे वस्ती येथील अंतर्गत रस्त्यांसाठी  1 कोटी 79 लाख 31 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. राधास्वामी आश्रमातील 24 मीटर डीपी रस्त्यासाठी 1 कोटी 84 लाख 80 हजार आणि चिखली चौक ते स्मशानभूमीकडे जाणार्‍या डीपी रस्त्यासाठी 1 कोटी 80  लाखांच्या  खर्चास मान्यता देण्यात आली. सोनवणे वस्ती ते चिखली चौक 24 मीटर डीपी रस्त्यासाठी 1 कोटी 84 लाख, कृष्णानगर हरगुडे वस्ती परिसरातील रस्त्यासाठी 2 कोटी 74 लाख, साने चौक ते चिखली चौक 30/24 मीटर डीपी रस्त्यासाठी  4 कोटी 40 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.