Mon, Apr 22, 2019 16:35होमपेज › Pune › पिंपरीतील ‘पीएमपी’चे विभागीय कार्यालय सुरू होणार?

पिंपरीतील ‘पीएमपी’चे विभागीय कार्यालय सुरू होणार?

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 12:45AM 

पिंपरी : नरेंद्र साठे

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीचे विभागीय कार्यालय बंद झाले.  यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पीएमपीएमएलसंदर्भात सूचना किंवा तक्रारी करण्यास थेट स्वारगेटला जावे लागत आहे. मुंढे यांच्यानंतर नयना गुंडे यांनी पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचडकरांसाठी कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

विभागीय कार्यालय सुरू करण्यासंदर्भात महापौर नितीन काळजे यांनी मुंढे यांच्या कार्यकाळात दोन बैठकांमध्ये प्रश्‍न उपस्थित केला; परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी राजकीय नेते मंडळीदेखील पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती समजते. त्यामुळे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे या पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी पीएमपीएमएलचे नारायण मेघाजी लोखंडे भवनमध्ये असलेले विभागीय कार्यालय बंद करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला.  मुख्य कार्यालयाच्या छताखालूनच सर्व कामकाज व्हावे याकरिता पिंपरीतील विभागीय कार्यालय बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करून त्यांच्या मूळ पदावर नियुक्त केले आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पिंपरीमध्ये पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय 2007 च्या दरम्यान सुरू करण्यात आले होते. यामुळे पीएमपीसंदर्भातील सर्व माहिती या विभागीय कार्यालयातून शहरवासीयांना मिळत होती. 

पिंपरीतील या विभागीय कार्यालयातून चेकर आणि स्टार्टरच्या ड्यूटीचे नियोजन केले जात होते. तीस स्थानकांवरून हे स्टार्टर काम पाहतात. याशिवाय कमर्र्चार्‍यांची इतर कामे या कार्यालयातून केली जात होती. शहरातील विविध भागांतील लोकप्रतिनिधी त्यांची तक्रार, सूचना घेऊन विभागीय कार्यालयात अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्‍न सोडवून घेत असत अथवा अर्ज करत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने बसमार्ग सुरू करण्यात आणि डेपो वाढवण्यासंदर्भात प्रशासन नेहमीच उदासीनता दाखवते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या वाढीबरोबरच उपनगरे वाढत आहेत; मात्र पिंपरी-चिंचवडला पीएमपीएमएलच्या बसेसची अपुरी संख्या व अवघे तीन डेपो यामुळे प्रवाशांना जलद व सुखकर सुविधा मिळत नाही. विलीनीकरण झाले तेव्हा पुण्यात 7, तर पिंपरी-चिंचवडला 3 डेपो होते. पुण्यात डेपोंची संख्या वाढली; मात्र पिंपरीत तीनच डेपो आहेत. शिवाय होते ते विभागीय कार्यालय देखील पीएमपीएमएल प्रशासनाने बंद केल्याने, पिंपरी-चिंचवडकरांना नेहमीच वेगळी वागणूक मिळत असल्याचे नागरिक म्हणत आहेत.