Fri, May 24, 2019 06:55होमपेज › Pune › पालिकेला भिकारी बनविण्याचा डाव

पालिकेला भिकारी बनविण्याचा डाव

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) स्थापण्याची मागणी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून’ (पीएमआरडीए) करण्यात आली आहे. अशी अन्यायकारक धोरणे तयार करून महापालिकेला भिकारी बनविण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.  सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी मात्र त्यावर एक चकार शब्द बोलण्यास तयार नाही. मात्र, पुणेकरांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिला आहे. 

‘पीएमआरडीए’कडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गाचा 75 टक्क्यांपेक्षा अधिक भाग पुणे पालिकेच्या हद्दीतून जातो. या मार्गासाठी एसपीए स्थापन झाल्यास मेट्रोच्या मार्गाच्या दोन्ही बाजुंनी पाचशे मीटर अंतरापर्यंत बांधकाम परवानगीचे अधिकार आणि उत्पन्न ‘पीएमआरडीए’ला मिळणार आहे. यासंबधीचे वृत्त दै. ‘पुढारी’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावर पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने आता जोरदार टीका केली आहे. 

याबाबत बोलताना तुपे म्हणाले, हे अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास पालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे. पालिकेच्या हद्दीत विविध मार्गांनी घुसखोरी करण्याचे नियोजन ‘पीएमआरडी’ने केले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा डाव यामाध्यमातून आखला जात आहे. ज्या भागातून मेट्रो मार्ग जात आहे, तेथील बांधकामाचे अधिकार देण्याची मागणी पीएमआरडीए करते. मात्र तेथील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन याबाबतची जबाबदारी घेत नाही. ‘पीएमआरडीए’ला विकासात रस आहे की बांधकाम परवानगीमध्ये हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.