Wed, Apr 24, 2019 21:47होमपेज › Pune › पालिकेत सोडले डुक्कर, शिवसेना नगरसेवकांचे आंदोलन(व्हिडिओ)

शिवसेनेने पालिकेत सोडले डुक्कर(व्हिडिओ)

Published On: Sep 03 2018 4:02PM | Last Updated: Sep 03 2018 4:59PMपिंपरी : प्रतिनिधी

थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करीत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका भवनातील कार्यालयात मंगळवारी चक्क डुक्कर सोडले. 

शहरात मोकाट कुत्र्यांसह डुकरांचा सुळसुळाट झाल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘पुढारी’ने वेळोवळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. तसेच, प्रभाग क्रमांक 24 थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. एकाच वेळी 15 ते 20 डुकरे कचराकुंडीभोवती फिरत असतात. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून दुर्गंधी सुटते. 

गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन नगरसेवक भोसले यांनी दिले होते. तसेच, त्यांनी सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र निष्क्रिय पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या परिसरात डुकरांचा त्रास कायम आहे, असा आरोप भोसले यांनी केला. 

वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या भोसले यांनी चक्क पिशवीत टाकून डुक्कर पालिका भवनात आणले. पिवशीत डुक्कर असल्याने ते सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले नाही. ते डुक्कर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका भवनातील दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात सोडले. नंतर ते डॉ. रॉय यांच्या टेबलवर ठेवले.

डुकराचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी डॉ. रॉय यांच्याकडे केली. केबिनमध्ये डुक्कर पाहून डॉ. रॉय यांच्यासह सुरक्षारक्षक, शिपाई आणि कर्मचार्‍यांची धांदल उठाली. डुक्कर पिशवीत ठेवण्याबाबत सुरक्षारक्षकाने अनेकदा विनंती केली, मात्र नगरसेवक भोसले यांनी काही न ऐकता, डुक्कर सोडून दिले. मोकाट डुकरांवर कारवाई करण्याची ग्वाही डॉ. रॉय व अतिरिक्त आयुक्त आष्टीकर यांनी दिल्यानंतर भोसले शांत झाले. आता डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे.