Fri, Jul 19, 2019 18:33होमपेज › Pune › दहावी-बारावी प्रमाणपत्रावर येणार छायाचित्र

दहावी-बारावी प्रमाणपत्रावर येणार छायाचित्र

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा; तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांच्या प्रमाणपत्रांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात अनेक ठिकाणी वापर करावा लागतो. तसेच शैक्षणिकदृष्ट्या देखील ही प्रमाणपत्रे अतिशय महत्त्वाची असतात. त्यामुळेच या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो (छायाचित्र) छापण्याचा विचार असून येत्या जून-जुलै महिन्यात दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांपासून हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर पुणे किंवा मुंबईसाठी करण्यात येणार असून यशस्वी झाल्यास राज्यभर राबविणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.
मंडळाच्या अध्यक्षा काळे यांनी मंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून विविध सकारात्मक बदल करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर जन्मस्थळ नोंदविणे, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कळविण्यात आलेल्या शिफारसींची कडक अंमलबजावणी करणे आणि यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवले आहेत. मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या दहावी तसेच बारावीच्या प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांचा फोटो असावा, ज्यामुळे प्रमाणपत्रांचा गैरवापर होणार नाही आणि ते प्रमाणपत्र त्याच विद्यार्थ्याचे आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसर्‍या कागदपत्राची गरज पडणार नाही. यासाठी अनेक विद्यार्थी तसेच पालकांची प्रमाणपत्रावर फोटो छापण्याची मागणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी वरील निर्णय घेण्याचे मंडळाच्या विचाराधिन असल्याचे सांगितले आहे.
यासंदर्भात माहिती देताना काळे म्हणाल्या, दहावी-बारावीच्या प्रमाणपत्र (बोर्ड सर्टीफिकेट) वर विद्यार्थ्यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यासाठी समितीबरोबर चर्चा करणार आहे. कारण परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोंच्या घरात असते. त्यामुळे फोटो छापण्याचा निर्णय एकदम घेतला तर विद्यार्थी आणि फोटोंची अदलाबदल होवून गोंधळ निर्माण होऊ शकतो. 
त्यासाठी फेरपरीक्षेत हा प्रयोग राबवता येवू शकतो. कारण फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असते. त्यामुळे काही अडचणी आल्या तर त्याचे ताबडतोब निरसन करता येवू शकते. फोटोसंदर्भात तज्ज्ञ समितीशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि पुणे किंवा मुंबईसाठी हा प्रयोग राबवला जाणार आहे. त्यानंतर हा प्रयोग राज्यभर राबवता येणार आहे. त्यामुळे निर्णय झाल्यास जून-जुलै महिन्यात दहावी तसेच बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रमाणपत्रांवर फोटो दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जेईई, निटच्या ऑनलाइन प्रश्‍नपेढीला उत्तम प्रतिसाद...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जेईई,नीट तसेच अन्य परीक्षांच्या तयारीसाठी मदत व्हावी.यासाठी विद्यार्थ्यांना मंडळामार्फत ऑनलाइन प्रश्‍नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून काही पालकांची प्रश्‍नांची काठीण्य पातळी वाढविण्याची मागणी आहे. ती देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असून तज्ज्ञांमार्फत प्रश्‍नांची काठीण्य पातळी वाढविण्यात येणार असल्याची माहिती देखील काळे यांनी दिली आहे.