Fri, Apr 26, 2019 10:11होमपेज › Pune › फलटण-बारामती लोहमार्ग रखडणार

फलटण-बारामती लोहमार्ग रखडणार

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:56AMपुणे : निमिष गोखले 

फलटण ते बारामती लोहमार्गाचे काम आणखी रखडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून फलटण ते बारामती लोहमार्ग होणार असल्याची नुसतीच चर्चा आहे; मात्र हा मार्ग अद्यापही कागदावरच असून, जमीन हस्तांतरणाचा तिढा सुटत नसल्याने प्रत्यक्ष कामास अजूनदेखील सुरुवात होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे 16 पैकी तब्बल 7 गावांतील जमिनीच्या मोजमापाचे काम थांबले असल्याने हा बहुप्रतीक्षित प्रकल्प रखडला आहे.  

दरम्यान, लोणंद-फलटण लोहमार्गाचे रखडलेले काम मार्च 2017 मध्ये पूर्ण झाले. मात्र, अजूनही मालगाडी वगळता येथून प्रवासी वाहतूक करण्यात येत नाही. फलटण-बारामती प्रस्तावित लोहमार्ग 24 किलोमीटर लांबीचा असून, तो एकेरी असणार आहे. त्यावर कोणती स्थानके असणार याबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही. हा मार्ग पूर्ण झाल्यास दक्षिण भारतातून उत्तर किंवा पूर्वेकडे जाणार्‍या रेल्वे, पुणे स्थानक टाळून जाऊ शकणार आहेत. 

सध्या अनेक गाड्या पुणे मार्गे दौंड-मनमाड अशा जात असून, त्यामुळे पुण्यावर अतिरिक्त ताण येतो व बहुतांश वेळा प्लॅटफॉर्म न मिळाल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होतो. फलटण-बारामती लोहमार्ग पूर्ण झाल्यानंतर या गाड्या कोल्हापूर-लोणंद-फलटण-बारामती-दौंड मार्गे उत्तर भारतात जाऊ शकणार आहेत. यामुळे सुमारे 70 किलोमीटर लांबचा वळसा वाचणार असून, वेळेचीही मोठी बचत होणार आहे; असे असले तरी सद्यःस्थितीत मात्र हा मार्ग पूर्ण होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. 

फलटण ते बारामती हा पट्टा उसासाठी प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणहून प्रस्तावित लोहमार्ग जातो, तेथे बहुतांश जणांची बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी रेल्वेला देण्यास विरोध दर्शवला असून, काही महिन्यांपूर्वी आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, रेल्वेने या प्रकल्पासाठीचे 130 कोटी रुपये राज्य सरकारकडे जमा केले आहेत. जमिनीचे मोजमाप झाल्यानंतर शेतकर्‍यांना ते पैसे मिळणार आहेत, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे मोजमापाच्या कामास विलंब होत असून, जमीन हस्तांतरण होऊ शकले नाही.