Tue, Apr 23, 2019 13:41होमपेज › Pune › कंडोम कचरा प्रश्‍नावर एनजीटीत याचिका

कंडोम कचरा प्रश्‍नावर एनजीटीत याचिका

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

कंडोमचा कचरा अविघटनशील कचरा म्हणून गृहीत धरावा आणि त्याप्रमाणे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून वापरलेले कंडोम नष्ट करावे, अशी मागणी करणारी पर्यावरणहित याचिका लॉयर फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात (एनजीटी) पर्यावरणहित याचिका दाखल केली आहे. 

न्या. सोनंम वांगडी आणि डॉ. नगीन नंदा यांनी याचिका करण्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊन प्रतिवादी पर्यावरण व वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ , जिल्हाधिकारी पुणे, आरोग्य विभाग, शहरी विकास विभाग आणि  तळेगाव नगरपरिषद यांना तसेच कंडोम निर्मिती उद्योगात असलेल्या कंपन्यांना 28 ऑगस्ट रोजी हजर राहून याचिकेबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी निखील जोगळेकर, बोधी रामटेके तसेच विक्टर डांतास, ओमकार केणी आणि शुभम बिचे यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी माध्यमातून ही पर्यावरणहित याचिका दाखल केलेली आहे.  

वापरलेले कंडोम कागदात गुंडाळून फेकून देणे किंवा जाळून टाकले जातात. त्यामुळे बर्‍यांचदा लॅटेक्स नावाच्या रासायनिक घटकामुळे अविघटनशील कंडोम पर्यावरणासाठी धोकादायक कचरा ठरतात. कंडोम निर्मितीच्या वेळेस वापरण्यात येणारे लुब्रीकंट (तेलकट घटक) आणि स्पेरीसिडल कोटींग यामुळे लॅटेक्स नावाचा घटक वापरून निर्मित केलेले कंडोम मोठ्या प्रमाणात अविघटनशील असण्याची क्षमता धारण करतात. अशा वेळी वापरलेल्या कंडोमचा कचरा नीट वर्गीकरण होत नसल्याने विघटनशील कचर्‍यात एकत्र होऊन पर्यावरणासाठी धोकादायक पसिस्थीती निर्माण करतो असे याचिकेतून मांडण्यात आले आहे. भारतात 10 कोटी कंडोमची वर्षभरात विक्री होते. येथील कंडोमनिर्मिती उद्योग अत्यंत श्रीमंत समजला जातो. या पार्श्वभूमीवर ही याचिका महत्त्वाचा पर्यावरणीय विषय मांडणारी आहे, असे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. 

काय आहेत याचिकेतील मागण्या

कंडोम हा वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण व विल्हेवाट करण्यायोग्य असल्याचा सल्ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावा आणि राज्य आरोग्य संचालक व शहरी विकास मंत्रालयाने धोरण निश्चित करावे. सर्व कंडोम निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी कंडोमच्या पाकिटावर वाचण्या योग्य अक्षरांमध्ये वापरलेल्या कंडोमचा कचरा कशा पद्धतीने  विघटन करावा, असे लिहावे तसेच कंडोमच्या जाहिरातीमध्ये या संदर्भात दर्शकांना दिसेल अशा ठळक अक्षरांमध्ये कंडोम कचरा वर्गीकरणाबाबत सूचना द्याव्या अशा वैशिष्ट्यपूर्ण मागण्या एनजीटीकडे करण्यात आल्या आहेत.