Tue, Nov 13, 2018 01:44होमपेज › Pune › पुरंदर विमानतळला आठवडाभरात मान्यता

पुरंदर विमानतळला आठवडाभरात मान्यता

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला येत्या आठवडाभरात मान्यता मिळेल, अशी माहिती जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी दिली.

स्थानिक शेतकर्‍यांच्या विरोधापासून हवाई दलाच्या ना हरकत प्रमाणपत्रापर्यंत अनेक अडचणी पुरंदरच्या विमानतळासमोर निर्माण झाल्या होत्या. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या सोबत जिल्हा प्रशासनाच्या अनेवेळा बैठका झाल्या आहेत. पुरंदर विमानतळ झाल्यास लोहगाव विमानतळावरील हवाई दलाच्या उड्डाणांना अडचण निर्माण होईल, असा मुख्य आक्षेप लष्कराकडून घेण्यात आला. मात्र, लोहगाव विमानतळावरील भारतीय वायुसेनेची विमान वाहतूक आणि पुरंदर विमानतळावरील विमान वाहतुकीमुळे हवाई उड्डाणांमध्ये समस्या निर्माण होणार नाहीत, असा अहवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया-एएआय) संरक्षण मंत्रालयाला पाठवला होता.

हवाई दलाच्या आक्षेपासह मुंबई-हैद्राबाद, मुंबई-गुलबर्गा येथे जाणार्‍या विमान उड्डाणांची रेषा समान येत होती. मात्र, त्यावर पर्याय सुचविण्यात आला आहे. विमानतळाच्या प्रस्तावावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची स्वाक्षरी झाली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे गेला आहे. त्यावर आठवडाभरात स्वाक्षरी होईल, असा विश्‍वास शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.