Fri, May 24, 2019 08:48होमपेज › Pune › प्रलंबित महसुली दावे लागणार मार्गी

प्रलंबित महसुली दावे लागणार मार्गी

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:31AMपुणे : दिगंबर दराडे

महसूल विभागातील प्रलंबित दावे मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने नवीन अतिरिक्‍त आयुक्‍तांचे पद निर्माण केले आहे. या पदामुळे  महसुली दावे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पहिल्यांदाच महसूलमध्ये हे पद निर्माण करण्यात आले आहे. पुणे विभागातील या पदावर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संधी मिळाली आहे.

 महसूल खात्याचा आकृतिबंध नव्याने ठरविण्यासाठी मध्यंतरी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला होता. कालानुरूप व्याप वाढला असून, काही पदांची नव्याने आवश्यकता आहे. सध्या असलेली पदे, त्यांची फेररचना आणि नव्याने निर्माण करावयाची पदे यांचा सविस्तर विचार समितीने या अहवालात केला होता.  त्यातही अतिरिक्‍त आयुक्त हे आणखी एक पद निर्माण करणे आवश्यक असल्याचे सूचविण्यात आले होते. त्यावर शासनाने निर्णय घेऊन अतिरिक्‍त आयुक्‍तांचे पद निर्माण केले आहे. 

वस्तू व सेवाकरामध्येच (जीएसटी) करमणूककर समाविष्ट झाल्याने महसूल प्रशासनातील उपायुक्त करमणूककर पद रद्द झाले.  महसूल दाव्यांची प्रलंबित संख्या लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त हे आणखी एक पद निर्माण करावे, त्याजागी उपायुक्तांची नेमणूक करावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता.  त्यास काही दिवसांचपूर्वी शासनाने मान्यता दिली होती. या नवीन पदी आता डॉ. दीपक म्हैसेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित असलेले महसुली दावे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.  

पाच जिल्ह्यांतून दावे दाखल होत असल्यामुळे त्यांची संख्या मोठी आहे. प्रलंबित दाव्यांची संख्याही जवळपास 12 हजारांपेक्षा अधिक असून, ते निकाली काढण्यात विलंब होतो. पर्यायाने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. अतिरिक्त आयुक्त हे आणखी एक पद नव्याने निर्माण झाल्याने प्रलंबित दावे निकाली काढणे शक्य होणार आहे.  महसूल यंत्रणेकडे अन्य विभागांची कामे सोपविण्यात येत असल्याने महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.  जमीनविषयक कामे करणे, जमिनविषयक कामांची नोंद ठेवणे, महसूल जमा करून सरकारी तिजोरीत भरणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही महसूल यंत्रणेची मुख्य कामे मानली जातात. अलिकडच्या काळात महसूल यंत्रणेवर अन्य विभागांची कामे सोपविली जात असल्याने मूळच्या कामांकडे थोडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्याकडून उमटत आहे. त्यावर उपाय म्हणून शासन नवीन पदे निर्माण करीत आहे.