Thu, Jun 27, 2019 12:05होमपेज › Pune › मावळात वाढल्या मोरांच्या शिकारी

मावळात वाढल्या मोरांच्या शिकारी

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:08PMकामशेत : वार्ताहर 

मावळ तालुक्यात वाढलेल्या बेसुमार शिकारी मुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. यात प्रामुख्याने पवन व आंदर मावळातील दुर्गम भागांमध्ये श्रावण महिन्यात मोर पक्षांची संख्या मोठी असते. या मोरांना पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटक ही उत्साही असतात. मात्र येथे काही बाहेरील शिकारी येऊन मोरांच्या शिकारी करीत असल्याने मावळातील मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून मोठी वनराई व येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याच बरोबर पवना, वडिवळे, शिरोता, आंद्रा, भुशी, वलवन, लोणावळा आदी धरणांच्या सानिध्यात असलेल्या मावळात मागील काही वर्षांमध्ये पुणे- मुंबईचे पर्यटक पर्यटनासाठी गर्दी करू लागले आहेत. यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ लागली. मात्र कालानुरूप ग्रामीण जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे ग्रामीण भागात दारूच्या पार्ट्या व इतर अनेक बेकायदा प्रकार घडू लागले आहेत. पर्यटनामुळे मावळातील ग्रामीण जीवन व वन्य जीवन यांच्यावरही मोठा परिणाम होऊ लागला असून या भागांमध्ये शिकारीचे प्रमाण मोठे वाढले आहे. याकडे वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. 

काही वर्षांपूर्वी चिखलसे गावाशेजारील डोंगर भागात मोरांची संख्या मोठी होती. येथील मोरांचे श्रावणातील नृत्य पाहण्यास व मोरांना पाहण्यास स्थानिकांसह पर्यटक येत. दिवसभर मोरांचे आवाज या परिसरात घुमत असत. मात्र या भागातील मोरांच्या वाढत्या शिकारीमुळे आता एखादा मोर दिसणेही दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असल्याचे गावचे माजी उपसरपंच विजय काजळे यांनी दिली. यसेच येळघोल गावच्या डोंगरात देखील मोरांच्या शिकारी वाढल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागास दिली आहे. याच प्रमाणे आंदर मावळातील कुसूर आणि बेंदेवाडी या दुर्गम भागात मोरांचे प्रमाण जास्त आहे. त्याच बरोबर वडेश्‍वर, नागाथली, गावाच्यात श्रावणाच्या महिन्यात मोरांची संख्या जास्त असते. पिसारा फुलवणार्‍या आणि नृत्य करणार्‍या या मोरांना पाहण्याचा पर्यटक ही आनंद घेतात. मात्र या मोरांच्या शिकारी काही बाहेरून आलेले शिकारी भर दिवसा करीत असून त्याचे खापर मात्र स्थानिकांवर फुटले जाते. मावळ तालुक्यातील नाणे अंदर व पवन मावळातील दुर्गम भागात वने असून येथे मोठया प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे. याठिकाणी चौक्या उभारून वन विभागाच्या अधिकार्‍यांनी गस्त घालणे गरजेचे आहे.