Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Pune › शांतताप्रिय शहरात तोडफोड अन् दहशत

शांतताप्रिय शहरात तोडफोड अन् दहशत

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:33AMपुणे : अक्षय फाटक

कधीकाळी पेन्शनरांचे शहर म्हणून ओळख बनलेल्या पुण्याकडे शिक्षण-करिअरसाठी धावणारे अन् अपेक्षापूर्ती करणारे महानगर म्हणूनही पाहिले जाते.  मुळा-मुठेच्या काठावर वसलेले हे शहर दिवसेंदिवस स्मार्ट होत असून सोयी-सुविधांची पूर्तता करू शकणारे शांत, सुरक्षित अन् सुसंस्कृत पुणे आपसूकच सर्वांसाठी हवेहवसे होतेय. मात्र, दशकभरापासून गोंधळ, तोडफोड, खून आणि गोळीबाराच्या घटनांनी अवघे शहर नागरिकांसाठी असुरक्षित बनलेय. निरोगी शहराचा आत्मा असलेली शांतता तर केव्हाच भंग पावली. त्यामुळे चहू बाजूंनी पसरत चाललेल्या या ऐतिहासिक नगरीचे स्वास्थ्य टिकवणे पोलिस प्रशासन आणि नागरिकांसमोर एक आव्हान बनू पाहात आहे.

शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख. पेठेत वसलेले शहर हळूहळू अवाढव्य वाढतेय. आधुनिक प्रगतीबरोबरच विकासाचे इमले चढत असतानाच शांतता बिघडवणार्‍या घटनाही शहरात वाढू लागल्याचे दिसत आहे. ‘गँग’वार आणित यातून घडलेली थरारक हत्यासत्र शहराने अनुभवले. पाच-सहा वर्षांच्या काळातच शहरात गुन्हेगारीच्या कारवायांनी कळस गाठला. शांतताप्रिय शहराने याचे वाईट परिणामही सोसले. डोईजड झालेले गँगवार काही डॅशिंग पोलिस अधिकार्‍यांच्या कणखर भूमिकेमुळे संपवण्यात काही प्रमाणात यश मिळाले.  दोन वर्षात शहरातले बहुतांश गुन्हेगारांना मोक्का व एमपीडीए सारख्या कारवाया करून पायबंद घातला गेला.  मात्र, शहरातला ‘स्ट्रीट क्राईम’चा रेषो कमी होत नसून वर्षागणिक त्यात वाढ होत आहे. 

एकेकाळी मध्यरात्रीही सहज फेरफटका मारता येणार्‍या शहरात नागरिक दिवसा ढवळ्या दहशत अनुभवत आहे.  वाहनांची तोडफोड करणार्‍या टोळके आणि भरधाव दुचाकीवर हातात नंग्या तलवारी अन् कोयते घेऊन फिरणार्‍या गुंडामुळे असुरक्षित बनले आहे.  नव्याने उदयास आलेल्या आणि ‘दादा’ होऊ पाहणार्‍या दोन तरुणांचा गटांनी आणि गल्लीतला भाईंनी मध्यवस्ती व उपनगरातील नागरिकांचे जगणे कठीण बनवले आहे. ‘भांडण दोघांचे अन् त्रास अख्ख्या गावाला’  अशीच काहीशी परिस्थिती शहराची झाली आहे. विशेषत: वारजे, हडपसर, येरवडा, भारती विद्यापीठ, दिघी तसेच पिंपरी-चिंचवड शहर यामुळे त्रस्त आहे. अचानक टोळके येते आणि पार्क केलेल्या वाहनांची राखरांगोळी करून जाते. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हा उपद्रव माजवला जातो.  यात नुकसान मात्र सर्वसामान्य नागरिकांचे होते. 

धक्कादायक म्हणजे, अशा घटनांमध्ये अल्पवयीन दादांचा सहभाग असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.  दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांमध्ये निम्मे दादा हे अल्पवयीन असतात.  त्यामुळे अशा दादांवर कारवाई करताना पोलिसही ‘कात्री’त सापडतात. समज देऊन सोडल्यानंतर किंवा बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर दोन-चार दिवसांत ते गल्लीत उथळ माथ्याने फिरतात. त्यांना सुधारण्याची संधी दिली जाते. मात्र याचा अर्थ भलताच घेऊन ‘कायदाही आमचे काही बिघडवू शकत नाही’, असेच काहीसे त्यांचे वर्तन असते.  कायद्याच्या चौकटीत ते अल्पवयीन ठरतात; पण, गल्लीतल्या भाईगिरीत ते  ‘दादा’ ठरत आहेत. शिक्षण घेऊन काहीतरी बनून दाखवण्याच्या वयातील मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याने शहरासाठी चिंताजनक आहे. शांतताप्रिय शहराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी गुन्हेगारी कारवाया संपुष्टात आणणे हे प्रशासन आणि नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे, हे निश्‍चित.