Mon, Nov 19, 2018 12:56होमपेज › Pune › ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद

‘पे अ‍ॅन्ड पार्क’ सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील वाढत्या खासगी वाहनांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पे अ‍ॅन्ड पार्कचे धोरण आणले आहे, त्यात दिवसाबरोबरच रात्रीही शुल्क आकारणाचा प्रस्ताव आहे, मात्र, या धोरणाच्या मंजुरीबाबत सत्ताधारी भाजपमध्येच मतभदे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या धोरणाची मंजुरीस मिळणे अवघड होणार आहे.

शहरात गेल्या काही वर्षात खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, त्यासाठी पुरेशी पार्किग व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. त्यामुळे खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पे अ‍ॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धोरण प्रशासनाने तयार केले असून, ते स्थायी समितीपुढे मंजुरी ठेवले आहे; मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून त्यावर निर्णय होत नसून, हा प्रस्ताव पुढे ढकलला जात आहे. त्यात आता या पार्किग धोरणांवर सत्ताधारी भाजपमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पे अ‍ॅन्ड पार्कला स्पष्ट शब्दात विरोध दर्शविला, आम्ही पुणेकरांवर अशा पध्दतीची कोणतीही योजना लादू देणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र, या धोरणात काही सुधारणा करून ते मंजुर करण्यासाठी सहमत आहे. पालकमंत्री गिरीश बापटही पे अ‍ॅन्ड पार्क योजनेसाठी सकारात्मक आहेत, मात्र, शहराच्या आता अध्यक्षांनी या योजनेबाबत थेट विरोधाचा पवित्रा घेतल्याने हे धोरण मंजुरीसाठी लटकणार असल्याचे स्पष्ट आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या धोरणाच्या मंजुरीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या धोरणाच्या मंजुरीसाठी ते शहराध्यक्षांचे मत वळविणार की नेहमीप्रमाणे थेट वरिष्ठ स्तरावरून धोरण मंजुरीसाठी फिल्डिग लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरात वाहतुक कोंडी वाढली आहे; मात्र, नुसते पे अ‍ॅन्ड पार्क करून हा प्रश्‍न सुटणार नाही. ही योजना आधी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरून राबवून, त्यास नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची गरज आहे. त्यानंतरच ही योजना संपुर्ण शहरासाठी राबविणे सयुक्तिक होईल.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, पुणे