Tue, Aug 20, 2019 04:06होमपेज › Pune › पार्किंगचे भूत बसणार ‘भाजप’च्या मानगुटीवर !

पार्किंगचे भूत बसणार ‘भाजप’च्या मानगुटीवर !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : हिरा सरवदे 

महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी दिलेल्या उपसूचनेनुसार पार्किंग धोरणांतर्गत शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्यात येणार आहे. उपसूचनेमध्ये नमूद केलेल्या ‘शहरातील प्रमुख पाच रस्त्यांंवर’ या वाक्यप्रयोगामुळे पार्किंगचे ‘भूत’ सत्ताधारी भाजपच्याच मानगुटीवर बसण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रायोगिक तत्त्वावरील रस्त्यांमध्ये आपल्या मतदारसंघातील रस्त्याचा तरी समावेश होणार नाही ना, या विचाराने लोकप्रतिनिधींमध्ये सध्या धाकधूक निर्माण झाली आहे. या धोरणाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील पार्किंग धोरण स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर या धोरणाला पुणेकरांनी जोरदार विरोध केला. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी उडाल्या. त्यातच सत्ताधारी नगरसेवकांनीही या धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारण सभेत मूळ पार्किंग धोरणातील जाचक तरतुदींना उपसूचनेद्वारे फाटा देऊन ते धोरण मंजूर करण्यात आले आहे. उपसूचनेनुसार शहरातील ‘प्रमुख पाच रस्त्यांवर’ प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्यात येणार आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते ‘शहरातील प्रमुख रस्ते’ म्हणून परिचित आहेत. 

उपनगरांमधील नगरसेवक सोडले तर मध्यवर्ती भागातील बहुतांश नगरसेवक, शहरातील सर्व आठही आमदार आणि शहराचे खासदार भाजपचे आहेत. ज्या मध्यवर्ती भागातील मतदारांनी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून देत पालिकेची सत्ता दिली. त्याच मध्यवर्ती भागातील मतदारांवर उपसूचनेनुसार पे अँड पार्कचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

विरोधी पक्षाचे नगरसेवक असलेल्या उपनगरांमधील रस्ते शहरातील प्रमुख रस्ते होऊ शकत नाही, त्यामुळे हे भूत उपनगरांमध्ये ढकलता येणे शक्य नाही. याला काहीसा पर्याय म्हणून विविध निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने कौल देणार्‍या कोथरूड आणि स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या औंध-बाणेर या परीसरातील काही रस्त्यांचा प्रायोगित तत्त्वावरील पे अँड पार्क साठी विचार होऊ शकतो. या दोन्ही परिसरातील बहुसंख्य नगरसेवक हे भाजपचेच आहेत. त्यामुळे पार्किंगचे भूत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपच्याच मानगुटीवर बसणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील रस्त्यांमध्ये आपल्या मतदारसंघातील रस्त्याचा तरी समावेश होणार नाही ना, या विचाराने नगरसेवकांमध्ये सध्या तरी धाकधूक सुरू आहे. यात आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची निवड झाल्यास मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची चिंता नगरसेवकांना सतावू लागली आहे. 

विधानसभा निवडणुकीत जाणवणार परिणाम

वाहतूक पोलिस आणि तज्ज्ञांशी चर्चा करून ‘शहरातील प्रमुख पाच रस्त्यां’वर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ योजना राबविली जाणार असल्याचे सत्ताधारी नेते छातीठोकपणे सांगत आहे. काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना अंमलात आणल्यास त्या भागातील नगरसेवकांपेक्षा जास्त अडचण आमदारांची होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आणखी चार वर्षांचा कालावधी आहे. पे अँड पार्क योजना सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी ती बंद होईल, किंवा संपूर्ण शहरात लागू होईल. त्यामुळे इतरांचे जे होईल ते आपले होईल, या विचाराने काही नगरसेवक निश्‍चिंत आहेत. मात्र, वर्ष-दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात असे धोरण राबविणे, सत्ताधारी आमदारांना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर कसबा, शिवाजीनगर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार ही योजना कशाप्रकारे हाताळतात, हे पाहावे लागेल. 

 

Tags : pune, pune news, Parking, Pay And Park, implemented,


  •