Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Pune › पवना बंदिस्त जलवाहिनीची टांगती तलवार 

पवना बंदिस्त जलवाहिनीची टांगती तलवार 

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:28AMवडगाव मावळ : गणेश विनोदे

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून घडलेल्या ‘मावळ गोळीबार प्रकरण’ या हिंसक आंदोलनाला आज 7 वर्षे पूर्ण होत असून, या प्रकल्पाला प्रखर विरोध करणार्‍या भाजपची गेली 4 वर्षांपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्‍ता असूूनही हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय अद्यापही झाला नसून, तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने ‘व्यर्थ ना हो बलिदान’चे काय, असा सवाल मावळातील जनता करत आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनने पाणी नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु या प्रकल्पाला मावळातील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला होता. यामध्ये प्रामुख्याने भारतीय किसान संघ आणि मावळातील सत्ताधारी भाजपने मोर्चे, आंदोलने करुन तीव्र विरोध दर्शविला होता. 

या आंदोलनाची पहिली ठिणगी गहुंजे येथे झालेल्या आंदोलनात पडली. गहुंजे येथे सुरु झालेल्या जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी भाजप, भारतीय किसान संघ व मावळातील शेतकर्‍यांनी केलेले आंदोलन पोलिस बळाच्या जोरावर हाणून पाडण्यात आले होते. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात मावळातील शेतकर्‍यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या आणि 9 ऑगस्ट 2011 रोजी क्रांतिदिनाच्या दिवशी मावळ बंद आंदोलन पुकारण्यात आले. मावळ बंद आंदोलन सुरु असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर येथे शेतकर्‍यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ‘मावळ गोळीबार प्रकरण‘ घडले. 

या मावळ गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांच्या गोळीचे लक्ष्य ठरलेले कांताबाई ठाकर,  मोरेश्‍वर साठे व शामराव तुपे या 3 निष्पाप शेतकर्‍यांचा बळी गेला. त्यामुळे या प्रकल्पाला आणि आंदोलनालाही गालबोट लागले आणि आता कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा निर्धार मावळवासीयांनी केला. मात्र, या हिंसक आंदोलनात बळी ठरलेल्या शेतकर्‍यांची आठवण करुन देवून ‘व्यर्थ ना हो बलिदान‘ चा नारा देत आम्ही सत्तेवर आल्यास पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेवू, शेतकर्‍यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेवू अशी आश्‍वासने भाजप नेते व पदाधिकार्‍यांनी दिली होती.

यानंतर भाजप सरकार राज्यातच नव्हे तर केंद्रातही सत्तेवर आले. इतकेच नाही तर मावळमध्ये आधीपासूनच भाजपची सत्ता होती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपचीच एकहाती सत्ता आली. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने हा प्रकल्प रद्दच होणार असा विश्‍वास मावळच्या जनतेला होता; परंतु सत्तेवर येवून 4 वर्षे उलटली तरी प्रकल्प रद्द करण्याबाबत निर्णय होवू शकला नसल्याने पवना बंदिस्त जलवाहिनीची टांगती तलवार आजही कायम आहे.

आंदोलनातील जखमी आजही उपेक्षितच

पवनानगर : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनात तीन आंदोलकांचे बळी गेले; तसेच काही आंदोलक जखमी झाले होते. आंदोलनातील जखमींना आजपर्यंत फक्त आश्‍वासनेच मिळत आहेत. त्यावेळी आघाडी सरकार सत्तेवर होते. विरोधातील  भाजपने शेतकर्‍यांना दिलासा दिला. तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पवनानगर येथे प्रचारसभेत आम्ही सत्तेवर आल्यानंतर मावळ गोळीबारातील सर्व शेतकर्‍यांचे गुन्हे मागे घेऊन जखमींना ताबडतोब पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देऊ असे आश्‍वासन दिले होते; मात्र आजही आंदोलनातील जखमी उपेक्षितच आहेत. आज केंद्रात व राज्यात तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना पवना बंदिसत जलवाहिनीविषयी कोणताही निर्णय होत नसल्याने व मावळ गोळीबारातील एकाही जखमींना नोकरी मिळालेली नाही. 

गोळीबारातील जखमी आंदोलक : अजित जालिंदर चौधरी, योगेश शंकर तुपे, शिवाजी वर्वे, अमित लक्ष्मण दळवी, नवनाथ मधू गराडे, विशाल राऊत, मारुती खिरीड, सुरेखा कुडे, गणेश तरस, काळुराम राऊत,  तुकाराम दळवी आदी. 

आणि.. भाजपची दुटप्पी भूमिका सुरू झाली!

दरम्यान, गल्ली ते दिल्ली सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला प्रखर विरोध करणार्‍या भाजपनेच तो रद्द करण्याऐवजी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकार्‍यांपासून पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनीच समन्वयाने मार्ग काढण्याची भूमिका घेतल्याने सत्तेवर आलेल्या भाजपच्या दुटप्पी भूमिकेला सुरुवात झाली. आमचा विरोध आजही आणि उद्याही.. संजय भेगडे, आमदारआमदार संजय भेगडे यांनी पवना धरणाच्या जलपूजन कार्यक्रमप्रसंगी आम्ही पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात कालही होतो, आजही आहोत आणि पुढेही राहणार असल्याचे स्पष्ट केले होते; तसेच ‘पुढारी’शी बोलतानाही हा प्रकल्प रद्द करण्यासाठीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. 

पवनानगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन 

पवनानगर : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या 

आंदोलनात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला. या आंदोलनात बळी गेलेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवनानगर येथे गुरुवारी (दि. 9) श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आंदोलन झालेल्या घटनास्थळारून ज्योत आणण्यात येणार आहे. पवनानगर चौकातुन रॅली काढून येळसे येथील स्मारकाजवळ ज्योत नेण्यात येणार आहे. त्यानंतर येळसे येथील शिवप्रसाद मंगल कार्यलयामध्ये श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी साडेबारा वाजता श्रदांजली वाहण्यात येईल. सभेस आमदार संजय भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर,उपसभापती, शांताराम कदम, एकनाथ टिळे, भारतीय किसान संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव शेलार,भाजपचे प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, राजू खांडभोर, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, सुर्यकांत वाघमारे,तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड,संत तुकारामचे कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर,माऊली शिंदे,तळेगाव,लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक तसेच या तिन्ही पक्षाचेआजी माजी अध्यक्ष, विविध गावचे सरपंच,आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.