Tue, Jul 07, 2020 21:52



होमपेज › Pune › पवना धरण भिंतीच्या मजबुतीकरणाचे काम रखडले

पवना धरण भिंतीच्या मजबुतीकरणाचे काम रखडले

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:46PM



पवनानगर :  रवि ठाकर

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरास पाणी पुरवठा करणार्‍या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. धरणाच्या भिंतीस धोका पोचल्याशिवाय जलसंपदा विभागाचे याकडे लक्ष जाणार नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

तिसर्‍या पंचवार्षिक योजनेत मावळ तालुक्यातील शेती व पिण्याचे पाणी व पिंपरी- चिंचवड व परिसराला औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आवश्यक असल्याने पवना धरण योजना आखण्यात आली. यात पवना धरणाचे बांधकाम 1963 साली सुरूवात होऊन 1972 साली ते पूर्ण झाले व पाणीसाठा केला गेला. या धरणाची  लांबी 5 हजार 577 फूट आहे, तर उंची 119 फूट आहे. यात मातीचा बांध 4 हजार 627, तर दगडी सिंमेट बांधकाम 950 फूट लांबीचे आहे. तर धरणात 9 . 61 टीएमसी पाणीसाठा आहे.

या धरणातील पाणीसाठा पहाता यातून पाणी गळती होऊ नये व बंधारा सुरक्षित रहावा  यासाठी मजबुतीकरणाची गरज लक्षात घेऊन 2004 साली पवना धरणाच्या मजबुतीकरणासाठी 22 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. ऑक्टोंबर 2004 ते नोव्हेंबर 2006  पर्यंत एका कंपनीकडून पक्क्या बंधार्‍याची गळती थांबविण्याचे काम सुपर ग्राऊट 666 चा वापर करून व ग्राऊटिंग मशिनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मोठी गळती थांबवली; परंतु दगड मातीच्या बंधार्‍याच्या मजबुतीकरणाचे काम सुरु असताना नोव्हेंबर 2006 मध्ये  धरणग्रस्तांनी हे काम बंद पाडले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यत काम होऊ देणार नाही अशी भूमिका घेत धरणग्रस्तांनी काम बंद पाडले. पवना धरणासाठी शासकीय आकडेवारीनुसार एकूण 6 हजार 197  एकर क्षेत्र संपादित करण्यात आले.  यात 1203 खातेदार बाधित झाले. यांपैकी 340 खातेदारांना प्रतेकी 4 एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित 863 खातेदार अजूनही न्यायासाठी लढत आहेत; परंतु शासन अजून किती वर्षे पुनर्वसनासाठी वाट पहायला लावणार अशी खंत प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहेत.