Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Pune › ‘डॉ. पतंगराव कदम चालते फिरते विद्यापीठ होते’

‘डॉ. पतंगराव कदम चालते फिरते विद्यापीठ होते’

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी

डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्य आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले. शिक्षणाबरोबरच त्यांनी हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला. खर्‍या अर्थाने ते चालते फिरते विद्यापीठ असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना व्यक्त करत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. पतंगराव कदम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, पलिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, संजय बालगुडे, मुरलीधर निबांळकर, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वसंत पवार, प्रकाश भालेराव, राहुल डंबाळे आदींनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘डॉ. कदम यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली. सुरुवातीला त्यांच्या शाळेत फक्त 12 विद्यार्थी होते. हळूहळू तो वटवृक्ष वाढत गेला आणि आज भारतात आणि परदेशात या विद्यापठीच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. 

बागवे म्हणाले, डॉ. कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते गोरगरिबांचे कैवारी होते. कामाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी सामाजिक भान ठेवले. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, डॉ. रोहित टिळक, नगरसेवक आबा बागुल, अविनाश बागवे, वैशाली मराठे आदी उपस्थित होते.