Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Pune › ‘आधार’पेक्षा ‘पासपोर्ट’ सेवा गतिमान

‘आधार’पेक्षा ‘पासपोर्ट’ सेवा गतिमान

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 12:35AMपुणे : प्रतिनिधी

परदेशात जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने किचकट प्रक्रियेतून जावे लागत असले तरी प्रक्रिया सुकर झाल्याने पासपोर्ट हातात पडण्याची गती ‘आधार’पेक्षा फास्ट असल्याचे दिसून येत आहे.

पासपोर्ट सेवा केंद्रांची वाढवलेली संख्या, अर्जदाराला अर्ज भरणे सोयीस्कर जावे म्हणून पासपोर्ट प्रतिनिधींची केलेली नेमणूक, तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार, कामकाजात केलेले बदल यामुळे पासपोर्ट केवळ 15 ते 20 दिवसांमध्ये प्राप्त होतो. त्या तुलनेत आधार कार्डसाठी अर्ज केल्यानंतर 45 ते 60 दिवसांत आधारकार्ड प्राप्त होते. पासपोर्ट काढण्याकरिता क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयामध्ये अर्ज केल्यानंतर दुसर्‍या दिवशीची तारीख कार्यालयाकडून दिली जाते. त्यानंतर, पोलिस सत्यापनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोस्टाद्वारे पासपोर्ट अर्जदाराच्या घरी प्राप्त होतो. या अत्यंत किचकट पद्धतीनंतरदेखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या उत्तम कार्य प्रणालीमुळे नागरिकांना पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे.

2017 रोजी 3 लाख 42 हजार 506 नागरिकांना पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयातर्फे पासपोर्ट देण्यात आले. सन 2016 च्या तुलनेत यामध्ये 59 हजार पासपोर्टची भर पडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अवलंबलेल्या धोरणामुळे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुकर झाली आहे.

प्रक्रिया सोपी; तरीही उशीर

आधारकार्डच्या बाबतीत (सोपी प्रक्रिया असूनसुद्धा) सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळते आहे. आधारकार्ड केंद्र सापडत नाही, सॉफ्टवेअर काम करीत नाही, हाताचे ठसे घेतले जात नाही अशा एक ना अनेक तक्रारी नागरिकांद्वारे केल्या जातात. ‘आम आदमी का अधिकार’ या आधारकार्डावरील ब्रीद वाक्यानुसार प्रत्येक प्रशासकीय कामात नागरिकांना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक नागरिक त्यापासून वंचित आहेत.