Thu, Aug 22, 2019 10:25होमपेज › Pune › संसद प्रतिनिधींच्या तोंडी असंसदीय भाषा शोभत नाही

संसद प्रतिनिधींच्या तोंडी असंसदीय भाषा शोभत नाही

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:51AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या तोंडी असंसदीय भाषा शोभत नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणास मान्यता दिली असल्याने, हे श्रेय भाजपचे आहे. त्यांच्याच हस्ते सदर कामाचे भूमिपूजन होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

महामार्ग रुंदीकरणावरून खासदार आढळराव व भाजपचे संलग्न आमदार महेश लांडगे यांच्यात ‘श्रेयवाद’ रंगला आहे. त्यासंदर्भात आढळराव यांनी गुरुवारी (दि. 14) आमदार लांडगे यांच्यावर टीका केली. त्यास उत्तर देताना पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गडकरी हे 2014 पासून केंद्रीय रस्ते मंत्री आहेत. त्यांची मी व आमदार लांडगे यांनी तब्बल 3 ते 4 वेळा या रस्त्यासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली आहे; तसेच वारंवार पाठपुरावा केला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांनी या कामास मान्यता दिली आहे. इतरांसारखे भेटीचे छायाचित्र घेऊन आम्ही चमकोगिरी केली नाही. 

दोन्ही पक्ष सत्तेत असूनही श्रेयवादावरून राजकारण का, असे विचारले असता, ते म्हणाले की, केंद्र व राज्यात भाजप व शिवसेना सत्तेत असताना खासदार आढळराव  महापालिकेत येऊन वारंवार भाजपवर टीका करतात. श्रेयासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. शिरूर मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा भाग पिंपरी-चिंचवड शहरात येतो. त्या भागासाठी कोणते ठोस काम खासदारांनी केले हे सांगावे. शहरातील रस्ता बनविण्याची त्यांची ही शेवटची वेळ असून, त्यानंतर त्यांना ढवळाढवळ करता येणार नाही, असा टोमणाही त्यांनी खासदार आढळराव यांना मारला.