Wed, Feb 20, 2019 18:53होमपेज › Pune › जिजाऊ भवन ला अतिक्रमणांचा विळखा 

जिजाऊ भवन ला अतिक्रमणांचा विळखा 

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:22AMनेहरूनगर : बापू जगदाळे

संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनच्या आवारात स्थानिक रहिवाशांनी आपल्या चारचाकी वाहनांच्या पार्किर्ंंगचा अड्डाच केला आहे. यामुळे येथील अनेक शासकीय व इतर कार्यालयांच्या कामकाजाला बाधा येत आहे. येथील काही कार्यालये लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात असून, त्याचा वापर होत नसल्याने येथील बकालपणात वाढ होत आहे. संत तुकारामनगर येथे  महापालिकेचे राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन असून, या भवनात सहकारी संस्था निबंधक कार्यालयांबरोबरच वजन-मापे निरीक्षक ही सरकारी कार्यालये आहेत.

या कार्यालयातून शहरातील त्यांच्या संबंधित असलेले कामकाज चालते; तर दुसर्‍या मजल्यावर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय आहे.  येथील काही कार्यालयांचा ताबा राजकीय पुढार्‍यांच्या कार्यकत्यार्ंकडे असून, ती कार्यालये वर्षानुवर्षे बंद आहेत. याचाच गैरफायदा येथील स्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधीधार्जिण्या कार्यकत्यार्ंकडून घेतला जात आहे. यामुळे परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.  

येथील अनेक भिंती धूम्रपान करून रंगवलेल्या अवस्थेत आहेत; तर पाण्याच्या टाकीचे लोखंडी झाकणदेखील काही समाजकंटकांनी चोरून नेले आहे; त्यामुळे पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी केला जात आहे. येथील कार्यालयांचा काही लोकांनी अनधिकृतपणे ताबा घेतला असल्यामुळे त्याचा वापर होत नसल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून सांगण्यात येत आहे. अनेक कार्यालये वापराअभावी पडून  असल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी दारूच्या पार्ट्या रंगतात. जी कार्यालये वापरात नाहीत त्या कार्यालयांचा ताबा महापालिका प्रशासनाने काढून घेऊन गरजू संस्थांना द्यावा, अशी मागणीही ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.