Fri, Nov 16, 2018 08:42होमपेज › Pune › शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी

शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:14AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड शहरातील काही शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाल्या आहे. परंतु काही शाळा 15 जूनपासून सुरू होणार असल्यामुळे पालकांनी  रविवारी (दि. 10) सुट्टीची संधी साधत शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. पिंपरी -चिंचवड ही उद्योगनगरी असल्यामुळे बहुतांश कामगार वर्गाचे पगार महिन्याच्या सात तारखेनंतर होतात. आता पुढच्या आठवड्यात शाळा सुरू होणार म्हणून सध्या रोजच दुकानामध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. येत्या शुक्रवारपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांनी आज वेळात वेळ काढून आपल्या पाल्याला नवीन वह्या पुस्तके त्याबरोबर आवश्यक असणारे इतर शालेय साहित्य खरेदी करून देण्यासाठी सजग झाले होते.

वह्या-पुस्तके, दप्तरे, रेनकोट, गणवेश अशा सगळ्याच वस्तूंची सध्या बाजारपेठेत गर्दी झाली आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स इत्यादीनी दुकाने सजली आहेत. महागाई वाढली असली तरी प्रत्येक पालकाच्या बजेटनुसार शालेय साहित्य उपलब्ध आहे. लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगांच्या, कार्टुन्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शालेय साहित्यांप्रमाणे विविध रंग, आकाराच्या छत्र्याही बाजारात दाखल होत आहेत. लहानमुलांना सहज उघडता येतील यासाठी ऍटोमॅटीक, सप्तरंगी, वजनाने हलक्या, आकर्षक डिझाईन्सच्या छत्र्याही बाजारात आल्या आहेत.बाजारपेठेत विविध प्रकारच्या, लहानग्यांना आकर्षित करतील अशा वह्या उपलब्ध असून शंभर पानी 140 रूपये डझन, दोनशे पानी 180 रूपये डझन, फुलस्केप पानी 300 ते 350 डझन अशा दराने उपलब्ध आहेत.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या व आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत. यावर कार्टुनसची चित्रे, बार्बी डॉल, ऍग्री बर्ड, स्पायडर मॅन, बेनटेन, डोरा, डोरेमॉन यांची चित्रे असलेल्या बॅगांना मुलांची जास्ती पसंती मिळते. या बॅगा 150 ते 700 रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच टिफीनसाठी देखील विविध प्रकारच्या आकर्षक बॅग विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत यावर देखील इतर बॅगप्रमाणे कार्टुन्सची छाप पडलेली दिसून येत आहे. यांच्या किंमतीही 50 पासून ते 200 रूपयांपर्यत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरबॅग आणि वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या बॉटल्स यांची बाजारात मोठ्या प्रमाणत आवक झाली आहे.