Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Pune › इंधन दरवाढीचा पालकांना फटका

इंधन दरवाढीचा पालकांना फटका

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 11:59PMपिंपरी : पूनम पाटील

नुकतेच परीक्षांचे निकाल लागले असून पालक मुलांच्या पुढील  शैक्षणिक वर्षाची तयारी करत आहेत. परंतु पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पालकांना यावर्षी आर्थिक फटका बसणार आहे. शाळांच्या भरमसाठ शेैक्षणीक शुल्काबरोबरच स्कूलबसच्या दरामध्ये वाढ झाल्याने पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सातत्यांने वाढ होत असून आता पालकांना स्कूलबसच्या नवीन दरानुसार आपल्या मुलांसाठी तीनशे ते चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महागाइने आधीच कंबरडे मोडलेले असल्याने त्यात आता हा वाढीव खर्च न परवडणारा असून मुलांना यापुढे शिकवायचे कसे असा सवाल पालकांना पडला आहे. 

शाळांकडून आता फीबरोबरच स्कूल बसचेही दर वाढवण्यात आले आहे. यामुळे ज्या ठीकाणी सहा महिन्यांचे सहा हजार रुपये मोजावे लागत होते आता त्याऐवजी सहा हजार तीनशे रूपये हा वाढीव दर आकारला जाणार आहे. शहरात शालेय व्यवस्थापनाने स्कूल बसचे नवीन रेटकार्ड पालकांना देण्यास सुरुवात केली आहे. त्यात दरमहा पन्नास ते तीनशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती पालकांनी दिली. पालकांची मुलांच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके, गणवेश खरेदी सुरु असून त्यात आता वाढलेला स्कूल बसचा दर पालकांची आर्थिक चिंता वाढवणारा आहे. आधीच गणवेश व पुस्तके महाग वाटत असतांना स्कूलबसचा खर्च दहा ट्क्कयांनी वाढला असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर दरदिवशी वाढत असल्याने जुन्या दराने गाड्या चालवणे परवडत नाहीत असे स्कूल बसचालकांचे  म्हणणे आहे. 

नवे रेटकार्ड बनवण्याची लगबग

शहरातून विविध शाळातून विविध मार्गावर हजारो स्कूल बस धावत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने पालक स्कूल बसलाच प्राधान्य देतात. याचाच फायदा घेत आणि पेट्रोल डिझेलचे दरवाढीचे कारण सांगत स्कूल बस ऑपरेटर्सनी तब्बल सहा ते दहा टक्क्यांनी रेट वाढवले आहेत. त्या हिशेबांने स्कूलबसचे नवीन रेटकार्ड बनवण्यात आले असून पालकांना ते देण्यात आले आहे. काही शाळात सुट्या असल्याने नवीन शैक्षणीक वर्षात हे रेटकार्ड देण्यात येईल असे सांगण्यात आले.