Thu, Apr 25, 2019 05:43होमपेज › Pune › आजही पानशेतची आठवण शहारा आणते!

आजही पानशेतची आठवण शहारा आणते!

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:22AMवेल्हे : दत्तात्रय नलावडे

पुणे शहर व जिल्ह्यातील लाखो रहिवाशांना, तसेच हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरणफुटीला गुरुवारी (दि. 12) 57  वर्षे पूर्ण झाली. 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले होते. त्या वेळी धरण परिसरासह सिंहगड, वरसगाव, खडकवासला, मुठा भागात अतिवृष्टी सुरू होती. पानशेत महापुराच्या या आठवणी सांगताना खडकवासला, हिंगणे खुर्द, नांदेड, शिवणे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना गहिवरून आले होते.

दुर्घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 जुलै 1961 रोजी दुपारनंतर परिसरात ढग फुटीचा मुसळधार पाऊस पडत होता. शेतीवाडी पाण्याखाली बुडाली. नाचणी, वरईची पिके जमिनीसह वाहून गेली. अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. पानशेत धरण भागात पावसाने हा हाहाकार माजविला होता. 12 जुलै रोजी सकाळी थोडा उजेड पडला आणि उंच डोंगर माथ्यावरील टेकपोळे, माणगाव, कुर्तवडी, कोशीमघर  आदी खेड्यांतील धरणग्रस्त घराबाहेर पडले. तरीही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

असाच भयानक पाऊस पानशेत धरणाखालील पानशेत रूळे, कुरण, सोनापूर, जांभली, सांगरूण सोनापूर, ओसाडे, निगडे मोसे, वरदाडे, मालखेड, खानापूर, सिंहगड  खडकवासला परिसरात कोसळत होता. कुरण खुर्द, कुरण बुदु्रक, पानशेत येथील काही शेतकरी घराबाहेर पडले असता त्यांना पानशेत धरणातून वाहणार्‍या पाण्यात काही बॅलर, पिंप वाहताना दिसले. त्यानंतर काही क्षणातच पानशेत धरणाच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचे लोट हवेत जोरदार फवारे उडवत वाहताना दिसले. वांजळवाडी सांडव्यातून प्रचंड वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या लाटाच्या हादर्‍याने पानशेत येथील पाटबंधारे खात्याच्या वसाहतीतील रहिवासी भीतीपोटी तातडीने बाहेर पडले. आंबी, मोसे व मुठा नद्यांना महापुर आला. तोपर्यंत दगड मातीचे पानशेत धरण फुटल्याची बातमी सर्वत्र पसरली होती.

नदीच्या तीरावरील कुरण बुद्रुक येथील आसपासच्या खेड्यातील रहिवाशी घरेदारे सोडून धावत बाहेर पळत होते. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी पुररेषे बाहेर गेली. धरणाच्या तीरावरील मालखेड, सोनापूर, सांगरूण, गोर्‍हे बुद्रुक, गोर्‍हे खुर्द, मांडवी आदी ठिकाणची शेतीवाडी पाण्यात बुडाली. खडकवासला धरणाखालील खडकवासला, कोंढवे धावडे, नांदेड, शिवणे, हिंगणे खुर्द आदी ठिकाणी रहिवाशांची धावपळ सुरू झाली. नदीच्या तीरावरील रहिवाशी पळत सुटले. या महाप्रलयाच्या आठवणीने 57 वर्षांनंतरही या खेड्यातील ज्येष्ठ, धरणग्रस्त, रहिवाशी भावनाविवष होत आहेत.

ज्येष्ठ नागरिक सांगत होते...

खानापूर येथील शांताराम बाबूराव जावळकर म्हणाले की, धरणाच्या पाण्यात शेतीवाडी बुडाली. स्मशानभूमीत पाणी शिरले होते. गावात पूर येईल या भीतीने सर्व लोक घरदार सोडून डोंगरावर निघून गेले होते.

ओसाडे येथील सखाराम कृष्णाजी लोहकरे म्हणाले की, पूर ओसरल्यानंतर खडकवासला धरण जवळपास कोरडे पडले. मुठा नदीच्या पात्रातून पाणी वाहत होते. तीरावरील शिवकालीन ओसाडजाई देवीच्या मंदिराचे अवशेष दिसत होते. पठाणबुवा येथील शिवकालीन धरणाच्या भिंती दिसत होत्या.

पानशेत येथील पाटबंधारे वसाहतीतील 80 वर्षांच्या ज्येष्ठ महिला सरोजिनी पांडुरंग देशपांडे म्हणाल्या, माझे पती पानशेत धरणावर नोकरीस होते. रात्रभर ते धरणावर अधिकार्‍यांसह धावपळ करीत होते. धरण फुटल्यानंतर मोठा आवाज झाला. वसाहतीतील सर्वजण मुलांबाळासह धावत घराबाहेर पडले. वसाहतीच्या दोन्ही बाजूने सांडव्यातून प्रचंड वेगाने पाणी फवारे उडवत वाहत होते. ते पाहून प्रचंड भीती वाटत होती. - सरोजनी देशपांडे, पानशेत

मालखेड येथील सोनबा साधू सुर्वे म्हणाले की, सकाळीच धरणाचे पाणी गावात शिरले होते. जोरी पाटील यांचे घर बुडून वाहून गेले. सर्वजण बायका-मुलांसह रस्त्यावर गेले. दुपारी खडकवासला धरण फोडल्यानंतर  सायंकाळी पूर ओसरला. - सोनबा सुर्वे, मालखेड