Thu, Apr 25, 2019 12:09होमपेज › Pune › भाजपातील पानसरे समर्थक अस्वस्थ

भाजपातील पानसरे समर्थक अस्वस्थ

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:43AMपिंपरी : जयंत जाधव

राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असणार्‍या माजी महापौर आझम पानसरे यांना पक्षाकडून दीड वर्ष उलटूनही अद्याप कुठलेच सन्मानीत पद दिले गेले नसल्याने पक्षातील पानसरे समर्थक अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. आगामी विधान परिषदेतील निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीत पानसरे यांचा क्रमांक लागावा म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व अपक्ष आ. महेश लांडगे यांनीही पक्षश्रेष्टींकडे जोर लावला आहे. परंतु; भाजपा पक्षश्रेष्टी तरी पानसरे यांना न्याय देतात का? याकडेच आता भाजपा कार्यकर्त्यांसह पानसरे समर्थकांचे डोळे लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असताना काँग्रेसचा व त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राज्याच्या राजकारणात प्रसिध्द होते. परंतु; 2014 च्या मोदी लाटेनंतर वातावरण बदलत गेले. राष्ट्रवादीचे राज्यातील नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आ. जगताप व आ.  लांडगे यांनीच भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले.  परंतु; तरीही पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव होईल, असे स्पष्ट चित्र नव्हते. परंतु; राष्ट्रवादीचे  अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून एकेकाळी ओळख असलेले  पानसरे यांनी ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. अजित पवार यांचे उट्टे काढण्यासाठीच एकेकाळचे विरोधक असलेले पानसरे व आ. जगताप एकत्र आले. पानसरे यांच्या प्रवेशामुळेच पिंपरी-चिंचवडला भाजपाची सत्ता आली, हे भाजपाचे स्थानिक व वरिष्ठ नेतेही मान्य करतात. पानसरे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे 20 ते 25 नगरसेवक पराभूत झाले, हेही दोन्ही पक्षाचे नेते मान्य करतात. अजित पवार यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या पानसरेंना 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीत पुन्हा आणण्यात आले. परंतु; त्यावेळी पानसरे यांना विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी देण्याचा शब्द अजित पवार यांच्याकडून पाळला गेला नाही. 

राष्ट्रवादीत सलग दोन पंचवार्षिक शहराध्यक्ष राहून राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असणार्‍या पानसरे यांना सातत्याने डावलेले गेल्यामुळेही ते अजित पवार यांच्यावर नाराज होते. याचा फायदा आ. जगताप व आ. लाडगे यांनी घेतला. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालत त्यांनी पानसरे यांचा पालिका निवडणुकीपुर्वीच प्रवेश घडविला. त्याचा भाजपला केवळ पिंपरी-चिंचवडलाच नव्हे तर पुणे शहरातही फायदा झाला, हे जिल्ह्याचे पालकमंत्री बापट यांनीही मुख्यमंत्र्यांशी खासगीत बोलताना मान्य केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. ही सर्व पार्श्‍वभूमी असली तरी पानसरे यांना जुलै महिन्यात होणार्‍या विधानपरिषदेच्या जागेंसाठी भाजपा उमेदवारी देणार का? हा कळीचा प्रश्‍न आहे. पानसरे यांना गेल्या दीड वर्षात कुठलेच पद भाजपाने दिले नसल्यामुळे  पानसरे समर्थक अस्वस्थ आहेत.  सत्तेच्या जल्लोषात सर्व गटाच्या नेत्यांवर कुठे ना कुठे गुलाल व भंडारा पडला पण अद्याप पानसरे गटाच्या समर्थकांवर सत्तेचा शिंतोडाही पडला नसल्याने पानसरे यांचे भाजापातील समर्थक नाराज आहेत. उघड-उघड ते बोलत नसले तरी आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत याची झलक भाजपाला दिसू शकते, असे पानसरे यांचे समर्थक खासगीत बोलतात. 

पानसरेंना न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांसह आमदारांचे प्रयत्न

मागील काही दिवसात पालकमंत्री बापट यांनीही पानसरे यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे जोरदार शिफारस केली आहे. तर शहराध्यक्ष आ. जगताप व आ. लांडगे यांनीही पानसरे यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला.  तसेच पक्षातील पदाधिकर्‍यांचे एक शिष्टमंडळ  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पानसरे यांच्या समर्थनासाठी भेटणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात व पानसरे यांना न्याय देतात का, याकडेच  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.