Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Pune › शिवप्रेमींच्या आक्रमकतेमुळे तावडे, मुंडे यांनी काढला पळ

शिवप्रेमींच्या आक्रमकतेमुळे तावडे, मुंडे यांनी काढला पळ

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:49AMलेण्याद्री : वार्ताहर 

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त आलेल्या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना किल्ले शिवनेरीवरून परतत असताना शिवकुंजजवळ राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमींनी घेराव घालत जोरजोरात घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. या घेरावाला पंकजा मुंडे सामोर्‍या जात असतानाच शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहताच तावडे व मुंडे यांनी तेथून काढता पाय घेतला.  

राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीसाठी येण्याकरिता असलेली पासची सुविधा बंद करावी,  अशी जोरदार मागणी केली. विविध भागांतून पहाटे चार वाजता मोठ्या संख्येने शिवभक्त आलेले होते;  मात्र त्यांच्याजवळ पास नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना गडावर जाण्यास मज्जाव केला.  त्यांना मुख्यमंत्री यांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाल्यानंतरच सोडण्यात आल्याने हे शिवभक्‍त संतप्त झाले होते.

मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेनंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक पाहिले.  त्यानंतर जुन्नर येथे असलेल्या सभेसाठी जाण्यासाठी हे दोन्ही मंत्री पायी मार्गाने निघाले असतानाच शिवकुंजजवळ त्यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागले.  या घोळक्याला मंत्री पंकजा मुंडे सामोर्‍या जाऊन हा गड शिवभक्तांचा असल्याचे सांगत शिवप्रेमींच्या भावना समजावून घेत होत्या;  मात्र  शिवभक्त अधिकच आक्रमक झाल्याने शेवटी मुंडे व तावडे यांनी तेथून जाणे पसंत केले.  या वेळी  जमावाने ‘हर हर महादेव’च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला, तर पासच्या कारणावरून व विविध मागण्यांवरून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.  

या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांच्याशी या जमावाने चर्चा करून समस्या मांडल्या.  त्यामध्ये किल्ले शिवनेरीवर राज्याच्या विविध भागांतून येणार्‍या शिवभक्तांसाठी असणारी पासची सक्ती रद्द करावी;  अन्यथा ऑनलाईन पासची व्यवस्था करावी,  ठिकठिकाणी साऊंड सिस्टिम व एलइडी स्क्रीन बसवावा,  जेणेकरून शिवनेरीच्या पायथ्याशी हजारो शिवभक्त ताटकळत उभे असतात त्यांना हा सोहळा पाहता येईल.  आमदार सोनवणे यांनी पुढील वर्षी या सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.