Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Pune › भिंतीआडची गुंडगिरी मोडीत

भिंतीआडची गुंडगिरी मोडीत

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:58AMपुणे : अक्षय फाटक 

कारागृहातल्या भिंतीआडही आपली दहशत निर्माण ठेवत बाह्यजगतात कारवाया करणार्‍या पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, कल्याणसह अन्य कारागृहांमधील तब्बल 150 नामचिन गुंडांचे अन्य तुरुंगांमध्ये स्थानांतर केले. यात नाशिकमधील सर्वाधिक 90 जणांना समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत कारागृह दक्षता विभागानेही धडाकेबाज कारवाई करत भिंतीआड चालणारी ही गुंडगिरी मोडीत काढली आहे. विशेष म्हणजे, कारागृहातील कुख्यात गुंडांसोबत अर्थपूर्ण लागेबांधे असणार्‍या आणि याकडे कानाडोळा करणार्‍या चार वरिष्ठ अधिकार्‍यांसह 11 कर्मचार्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला.  त्यामुळे राज्यातील कारागृहातही गुंडगिरी करणार्‍यांना चांगलीच जरब बसली आहे. 

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 13 खुली कारागृहे, एक खुली वसाहत आणि 172 उप-कारागृह आहेत. या कारागृहात जवळपास 32 हजारांहून अधिक कैदी आहेत. यात आठ हजार 646 शिक्षा झालेले आणि 24 हजार न्यायालयीन कैदी आहेत.  तर, स्थानबद्ध केलेले 105 आरोपी आहेत. या सर्व कैद्यांमध्ये महिला कैद्यांची संख्या दीड हजारांच्या जवळपास आहे. 

कारागृहात येणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार नसते. मात्र, अनावधानाने किंवा छोट्या चुकीमुळे पुढील काही वर्षे किंवा अख्खे आयुष्यही काही जणांना कारागृहात घालवावे लागते. तर, अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात.  राज्यातील कारागृहांमध्ये कुख्यात गुंड, गुन्हेगारी टोळ्याचे म्होरके आणि  त्यांचे साथीदार, दहशतवादी, सराईत व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत.

महानगरात नामचिन गुंड आणि त्यांच्या टोळ्या कार्यरत असतात.  या टोळ्यांची नागरिकांमध्येही दहशत असते. टोळी युद्धातून अनेक भयावह आणि रक्तरंजित घटनाही घडल्या आहेत. त्याची झळ सर्वसामान्यांना बसते. पुण्यासारख्या शहरातही गजा मारणे, निल्या उर्फ निलेश घायवळ, बाबा बोडके या टोळ्या आहेत.  

प्रत्येक मोठ्या शहरात कमी-जास्त प्रमाणात अशी परिस्थिती आहेत. त्याला पोलिस दलांचे दुर्लक्ष आणि राजकीय व्यक्तींचे आशीर्वाद कारणीभूत ठरत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे गँगस्टर्संना कुणाचेही भय राहिलेले नाहीत. मात्र, कायदा-सुव्यवस्था धोक्याच्या येण्याची स्थिती येताच टोळ्या आणि सराईतांवर मोक्का व स्थानबद्धसारख्या कारवाया करून त्यांची रवानगी कारागृहात होते. त्यानंतर काही प्रमाणात शहर शांत राहते.  काहीकाळ कारागृहात घालवल्यानंतर कुख्यात गुंड, टोळ्यांचे म्होरके  बाहेर असणार्‍या दहशतीच्या जोरावर येथेही गुंडगिरी सुरू असते. पैसा, ‘पॉवर’ आणि कारागृहातील काही अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मदतीने बाह्य जगतातही टोळ्या चालवतात. 

कारागृहातील उघड झालेल्या गैरप्रकारातून हे स्पष्ट झालेले आहे.  अशाच जवळपास त्या-त्या भागातील स्थानिक व दहशत निर्माण करणार्‍या दीडशे गुंडांना राज्यातील अन्य कारागृहांमध्ये हलवले आहे.  कारागृह दक्षता विभागाने ही कारवाई केली आहे.  

जवळपास शंभर मोबाईल जप्त 

कारागृहातील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता पथक कार्यरत असते.  हे पथक राज्यातील कोणत्याही कारागृहाची अचानक तपासणी करते. कारागृहात चालणार्‍या अवैध प्रकारांची माहिती देण्यासाठी कारागृहात तक्रारपेटी असते. त्यात कैदी व कर्मचारीही तक्रार करतात. तर, या पथकाचे प्रत्येक कारागृहात आपले खबरीही असतात. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षात पथकाचे सहायक आयुक्त राजेेंद्र जोशी व त्यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत जवळपास शंभर मोबाईल, काही बेकायदेशीर साहित्य हस्तगत केले. सर्वात जास्त कारवाया खबरींनी दिलेल्या माहितीवरून केल्या गेल्या आहेत. 

अशी होते कारवाई...

एखाद्या कारागृहात दक्षता पथकाने कारवाई केल्यानंतर त्याचा सविस्तर गुप्त अहवाल वरिष्ठांना देण्यात येतो. त्यात कर्मचारी किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार, दोन वर्षात वरिष्ठ अधिकार्‍यांसह अकरा जणांवर कारवाई झाली. यात दोन कर्मचार्‍यांचे निलंबनही करण्यात आले आहे. तर, नाशिक येथील कारागृह अधीक्षकांसोबतच तुरूंग अधिकारी व कर्मचारी अशा अकरा जणांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.