Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Pune › ‘पंढरपूर’चा संशोधनात्मक अभ्यास व्हावा

‘पंढरपूर’चा संशोधनात्मक अभ्यास व्हावा

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

अनेक साहित्यिक, लेखक, संशोधक ‘पंढरपूर’वर अभ्यास करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर पुस्तकरूपी मांडत आहेत. मात्र, पंढरपूरमधील अजूनही काही गोष्टी अशा आहेत की, त्या समाजापासून अनभिज्ञ आहेत. त्याचा नव्या पिढीने संशोधनात्मक अभ्यास करायला हवा, असे मत भाजपचे प्रवक्ते व महाराष्ट्र राज्य पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक वा. ल. मंजुळ लिखित ‘श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर: संशोधनातून’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक गो. ब. देगलुरकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, समाजशास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर वारी ही 900 वर्षे अविरतपणे चालणारा उपक्रम आहे. एवढी वर्षे एखादा उपक्रम चालू आहे याची प्रेरणा, कारण काय असावे? लाखो लोकांचा श्रद्धास्थान असणार्‍या पंढरपूरचा सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक अशा विविध अंगांनी अभ्यास का झाला नाही? असा प्रश्‍न पडतो. गेल्या 35 वर्षात पंढरपूर नक्कीच बदलले. मात्र येणार्‍या वारकर्‍यामुळे पंढरपूरचा विकास झाला. चौकटबद्ध दृष्टीने इतिहास लेखन करणार्‍यांच्या इतिहास लेखनाच्या साच्यात पंढरपूरचे वैभव बसत नाही, त्यामुळेच पंढरपूरचा शास्त्रीयदृष्ट्या लेखन झाले नाही ही शोकांतिका.

नव्या पिढीने नव्यादृष्टीने पंढरपूरच्या इतिहासाची मांडणी करावी. डॉ. ढेरे म्हणाल्या, संतानी ज्या विठ्ठलाला आपल्याकडे आणले आहे, ज्याची परंपरा इतकी महान आहे, त्याकडे आधुनिक महाराष्ट्र कोणत्या दृष्टीने पाहत आहे? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आपली सांस्कृतिक जडणघडण करण्याठी या क्षेत्राचा खरच उपयोग होतो का हे तपासून पाहण्याची गरज आहे. कार्यक्रमात विठ्ठल मुर्तीचे, मंदिराचे महत्त्व सांगताना डॉ. गो. बं. देगलुरकर म्हणाले, अलीकडे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी समिती तयार झाली आहे. या कामासाठी शासनाकडून अनुदानही मिळते. मात्र, विकासाच्या नावाखाली मंदिरासमोर एखादी वास्तू उभारून अथवा एखादे सभामंडप उभारून मुळ देऊळाचे विद्रुपीकरण केले जाते.